नोबेलसाठी ट्रम्प यांचं नामांकन दिलं नाही म्हणून भारतावर टेरिफ, न्यूयॉर्क टाईम्सचा खळबळजनक दावा

वाढवलेल्या टेरिफमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष येत्या काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

वॉशिंग्टन डीसी – भारतावर अमेरिकेनं जास्तीचा आयात कर लादला याचं कारण आता ट्रम्प यांच्याशी व्यक्तिगत पातळीवर असल्याची माहिती समोर येतेय. भारत आणि अमेरिका यांच्यातील तणावाचं महत्त्वाचं कारण हे ट्रम्प यांच्या नोबेल नामांकनाशी संबंधित असल्याचा खळबळजनक दावा अमेरिकेतील न्यूयॉर्क टाईम्स या वृत्तसंस्थेनं केला आहे.

या वृत्तात असं नमूद करण्यात आलं आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांनी 17 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. यावेळी त्यांनी भारत-पाकिस्तान शस्त्रसंधी केल्याबाबत किती अभिमान असल्याचं त्यावेळी सांगितलं होतं.

नोबेलसाठी नामांकनासाठी ट्रम्प आग्रही

पाकिस्ताननं नोबेलसाठी आपल्या नावांचं नामांकन केल्याची माहितीही यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांना दिली. भारतानंही हे करावं, असा गर्भित इशाराही यावेळी ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधानांना देण्यात आला. या सगळ्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी नाराज झाल्याची माहिती आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या शस्त्रसंधीशी अमेरिकेचा कोणताही संबंध नाही, हे मोदींनी स्पष्ट केलं. भारताच्या आक्रमक माऱ्यांमुळे पाकिस्तान गुडघ्यावर आल्यामुळे हे घडलं हेही पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केलं.

ट्रम्प यांच्याकडून मोदींच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शस्त्रसंधीत ट्रम्प यांचा कोणताही सहभाग नाही, हे स्पष्ट केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी या वक्तव्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं. यानंतर दोन्ही नेत्यांमधील सघर्ष अधिक विकोपाला गेल्याचं सांगण्यात येतंय. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये कुठल्याही प्रकाराचा संवाद झाला नसल्याची माहिती आहे.

ट्रम्प यांनी मोदी यांच्यातील वैयक्तिक संबंधांचा परिणाम दोन्ही देशांवर मोठा परिणामकारक ठरेल अशी शक्यता आता वर्तवण्यात येतेय. ट्रम्प यांनी टेरिफच्या उचललेल्या पावलामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील नातं कमकुवत होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे भारत आपली अर्थव्यवस्था अधिक गतिशील करण्याच्या प्रयत्नात असताना, देशाशी सर्वाधिक व्यापारी ऋणानुबंध असणाऱ्या अमेरिकेची ही टेरिफ वाढ भारतातील उद्योगांना परवडणारी नाही.
यामुळं या दोन्ही देशांच्या नात्यांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते आहे.

ट्रम्प आणि मोदी यांच्या मैत्रीत अंतर

एकेकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख खरा मित्र असा केला होता. मात्र आता ते संबंध बिघडत चालल्याचं दिसतंय. राष्ट्रपती कार्यालयीतल सूत्रांच्या माहितीनुसार या वर्षाखेरीस होणाऱ्या क्वाड देशांच्या मिटिंगमध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आता उपस्थित राहणार नाहीत. आत्ता काही काळापर्यंत ते या मिटिंगला उपस्थित राहतील असं सांगण्यात आलं होतं.

भारतात आता ट्रम्प यांच्याविरोधात नकारात्मक वातावरण निर्माण झालेलं आहे. गणेशोत्सवात महाराष्ट्रात पाठीत खंजीर खुपसणारा म्हणून ट्रम्प यांची प्रतिकृती साकारण्यात येते आहे. अमेरिकेकडून जी काही कठोर पावलं उचलण्यात येतायेत. त्याला भारतीय अधिकाऱ्यांनी गुंडागिरी असं नाव दिलेलं आहे.


About Author

Smita Gangurde

Other Latest News