कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडातील कॅफेवर गोळीबार, 9 राऊंड फायर, 3 दिवसांपूर्वी झालं होतं उद्घाटन

ज्यावेळी कॅफेवर गोळीबार करण्यात आला त्यावेळी हल्लेखोरांनी त्याचं व्हिडीओ शूटिंगही केलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

सरें, कॅनडा- कपिल शर्मा शोच्या नावानं जगभरात प्रसिद्ध असलेल्या कपिल शर्माला मोठा झटका बसलाय. कॅनडातील ब्रिटस कोलंबिया भागातील सरें या ठिकाणी तीन दिवसांपूर्वी कपिल शर्मानं उघडलेल्या कॅफेवर गोळीबाराची घटना घडलीय. कफ्स कॅफे नावाच्याया कॅफे हाऊसवर बुधवारी रात्री गोळीबार करण्यात आला. यावेळी 9 राऊंड्स फायर करण्यात आलेत.

खलिस्तानी दहशतवादी हरजीतसिंह लाडी यानं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याची माहिती आहे. गरजीत सिंह हा एनआयएच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीतील दहशतवादी आहे. हरजीत सिंह हा बब्बर खालसा इंटरनॅशनल या संस्थेशी संबंधित असल्याचीही माहिती आहे.

गोळीबाराचा व्हिडीओ व्हायरल

ज्यावेळी कॅफेवर गोळीबार करण्यात आला त्यावेळी हल्लेखोरांनी त्याचं व्हिडीओ शूटिंगही केलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओत कॅफेच्या बाहेर गाडीत बसलेला आरोपी सलग कॅफेत गोळीबार करत असल्याचं दिसतंय. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी वा कुणाचा मृत्यू झालेला नाही.

कपिल शर्माच्या वक्तव्यावरुन नाराजी

गोळीबाराची घटना घडल्यानंतर पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली असून पुढील तपास सुरु करण्यात आलाय. कपिल शर्मा यानं केलेल्या एका जुन्या वक्तव्याचा राग मनात ठेवून हरजीत सिंह लाडीनं हा गोळीबार घडवल्याचं सांगण्यात येतंय.

विश्व हिंदू परिषदेचा नेता विकास प्रभाकर उर्फ विकास बग्गा याच्या हत्येप्रकरणी हरजीत सिंह लाडी याचा शोध एनआयए घेत आहे. एप्रिल 2024 मध्ये विहिपच्या नेत्याची पंजाबच्या रुपनगर जिल्ह्यात दुकानात गोळी मारुन हत्या करण्यात आली होती.

कॅनडात ए पी ढिल्लोच्या घरावरही झाला होता गोळीबार

यापूर्वी कॅनडात पंजाबी गायक ए पी ढिल्लो याच्या घराबाहेर 1 सप्टेंबर 2024 रोजी गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. यात आरोपी घराच्या बाहेर 14 राऊंड फायर करताना दिसला होता. लॉरेन्स बिश्नोई आणि रोहित गोदारा गँगनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. सलमान खानसोबत ओल्ड मनी म्युझिक व्हिडीओसाठी काम केल्यामुळे गोळाबीर करण्यात आल्याचं कारण देण्यात आलं होतं. सलमान खानपासून दूर राहण्याचा सल्लाही देण्यात आला होता.

खलिस्तानी दहशतवादी भारताच्या विरोधात हिंसा करण्याच्या प्रयत्नात असल्याचा गुप्त अहवाल कॅनडाच्या गुप्तचर यंत्रणांनी काही दिवसांपूर्वी दिला होता.

 


About Author

Smita Gangurde

Other Latest News