नवी दिल्ली- पहलगाम हल्ल्याची जबरदस्त शिक्षा पाकिस्तानला भारतीय सैन्यदलांकडून देण्यात आली आहे. भारतीय हवाई दलानं ऑपरेशन सिंदूरच्या काळात 50 पेक्षाही कमी शस्त्रास्त्र डागली तर पाकिस्तान गुडघ्यावर झुकला आणि त्यांच्याकडून शस्त्रसंधी करण्याची मागणी करण्यात आली.
भारतीय हवाई दलाचे उप प्रमुख आणि एयर मार्शल नर्मदेश्वर तिवारी यांनी ही माहिती दिली आहे. या सगळ्यात पाकिस्तानला त्याची जागा दाखवण्यासाठी क50 पेक्षाही कमी शस्त्रास्त्रांचा वापर करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय.

काय म्हणाले एयर मार्शल तिवारी?
ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीर परिसरात असलेले दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. ज्यावेळी याचं नियोजन सुरु होतं त्यावेळी मोठ्या संख्येनं दहशतवादी तळांची माहिती भारतीय सैन्याकडे होती, असं त्यांनी सांगतिलंय. त्यातील केवळ 9 ठिकाणीच हल्ला करण्यात आल्याचं तिवारी यांनी सांगितलंय. याही ठिकाणी भारतीय हवाई दलाची केवळ 9चं हत्यारांचा वापर झाला त्यानंही पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार झाल्याचं तिवारी यांनी सांगितलंय.
केंद्रीय स्तरावरुन काय मिळाले होते आदेश?
पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं भारतीय सैन्यदलाला तीन महत्त्वाचे निर्देश दिले होते. त्यात शत्रूच्या विरोधात करण्यात येणारी कारवाी ही कठोर आणि शिक्षा देणारी असायला हवी. या हल्ल्यांतून असा संदेश जायला हवा की, यातून पुढे शत्रू राष्ट्राची हल्ला करण्याची हिंमतही व्हायला नको, तिसरा संदेश असा होता की, युद्धाबबात निर्णय घेण्याचे सर्वाधिकार सैन्यदलाला असतील, तसंच हा संघर्ष पारंपरिक युद्धासारखा असणार नाही, याची तयारीही सैन्यानं ठेवायला हवी.
इंटिग्रेटेड एयर कमांड आणि कंट्रोल सिस्टिमचं केलं कौतुक
एयर मार्शल तिवारी यांनी देशाच्या इंटिग्रेटेड एयर कमांड आणि कंट्रोल सिसिट्मिचं कौतुक केलंय. चार दिवस चाललेल्या संघर्षात ही व्यवस्था आक्रमक आणि संरक्षणासाठी सर्वाधिक उपयोगी ठरल्याचंही त्यांनी सांगितलंय. या व्यवस्थेमुळं पाकिस्ताननं सुरुवातीला केलेले हल्ले पचवता आले आणि त्यानंतर पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देणं शक्य झालं असंही तिवारी यांनी सांगितलंय. या सिस्टिममुळेच पाकिस्तानला शस्त्रसंधीसारखं तणाव कमी करण्याचं पाऊल उचलावं लागलं. असंही तिवारी म्हणालेत.











