MP Breaking News
Sat, Dec 13, 2025

पावसाळी पर्यटनासाठी महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील ‘ही’ ठिकाणे आहेत बेस्ट, पाहा यादी

Written by:Rohit Shinde
मान्सूनचं आगमन झाल्यावर सर्वांना पावसाळी पर्यटनाचे वेध लागतात. महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील राज्यांत नेमकी अशी कोणती स्थळे आहेत? जाणून घेऊ...
पावसाळा सुरू झाला आहे. महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतातील काही भागांत मान्सूनच्या पावसाचं आगमन झालं आहे. अशा परिस्थितीत सर्वांना वेध लागतात पावसाळी पर्यटनाचे. पावसाळी पर्यटनासाठी महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक आणि केरळ ही राज्ये अतिशय सुंदर ठिकाणांनी नटलेली आहेत. या राज्यांमध्ये पावसाळ्यात निसर्गाचा अप्रतिम अनुभव घेता येतो.

महाराष्ट्रातील पावसाळी पर्यटनाची ठिकाणे

महाराष्ट्रामध्ये पावसाळी पर्यटनासाठी लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, मुळशी, भीमाशंकर, हरिश्चंद्रगड आणि मालशेज घाट ही ठिकाणे प्रसिद्ध आहेत. हिरवीगार डोंगररांग, धबधबे आणि धुके यांनी हे भाग मनोहारी दिसतात. ट्रेकिंग आणि निसर्ग निरीक्षणासाठी हे उत्तम ठिकाण आहे. मान्सूनच्या काळात या ठिकाणांवर पर्यटकांचा विशेष ओढा असतो. या ठिकाणांवर पर्यटक गर्दी करत असतात.

दक्षिण भारतातील पावसाळी पर्यटनाची ठिकाणे

तेलंगणामध्ये, अंजेठी जंगल, बोगाथा धबधबा, एथीपुर, आणि कोन्नासागर डॅम ही ठिकाणे पावसाळ्यात खूपच सुंदर दिसतात. विशेषतः बोगाथा वॉटरफॉलला “तेलंगणाचा नायगारा” असेही म्हणतात. येथील निसर्ग शांत आणि रमणीय आहे. कर्नाटकमध्ये, कुर्ग, चिकमंगळूर, अगुंबे, गोकर्ण, शरावती धबधबा ही ठिकाणे पावसाळ्यासाठी आदर्श आहेत. अगुंबे हे ठिकाण भारतातील सर्वाधिक पावसाचे क्षेत्र म्हणून ओळखले जाते. कुर्ग आणि चिकमंगळूरमधील कॉफीचे मळे आणि धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात.

केरळमध्ये, पावसाळ्यात मुन्नार, थेक्कडी, वायनाड, अथिराप्पिल्ली धबधबा, आणि आलेप्पी ही ठिकाणे अतिशय रम्य वाटतात. खासकरून केरळची मॉन्सून आयुर्वेदिक थेरपी देखील पर्यटकांसाठी आकर्षण असते. ही सर्व ठिकाणं निसर्गाच्या सानिध्यात शांतता, सुंदरता आणि एक वेगळा अनुभव देतात. पावसाळ्यात या भागांना भेट देणे म्हणजे निसर्गाशी एकरूप होण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

पावसाळी पर्यटन करताना काळजी घ्या

पर्यटकांनी पावसाळी पर्यटन करताना विशेष काळजी घ्यावी, या काळात रस्ते अपघात वाढत असतात. वाहने जपून चालवावीत. त्याचबरोबर धबधबे, नद्या अशा परिस्थितीत जाताना पाण्याचा अंदाज घेत आनंद घ्यावा. शिवाय काही ठिकाणी वीज कोसळणे, अथवा वादळांचा धोका संभवतो, अशावेळी देखील विशेष काळजी घ्यावी.