गृहकर्ज स्वस्त होणार, EMI ही कमी होणार, RBI नं व्याजरात केली कपात, काय होणार परिणाम?

Smita Gangurde

मुंबई – नव्या आर्थिक वर्षांत नवं घर, चारचाकी खरेदी करण्याचा विचार करणार असाल तर आनंदाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी व्याजदरात 0.50 टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळं येत्या काळात बँका कर्जाचे दर कमी करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

2025 या वर्षभरात रेपो रेटमध्ये आरबीआयकडून 1 टक्का कपात करण्यात आली आहे. फेब्रुवारीत रेपो रेट 6.5 वरुन 6.25 टक्के करण्यात आला. पाच वर्षांनी चलनविषयक धोरण समितीनं हा निर्णय घेतला होता. त्यानंतर एप्रिलमध्ये आणखी 0.25 कपात करण्यात आली. त्यानंतर आता रेपो रेट 0.50 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

रेपो रेट म्हणजे काय?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय ज्या व्याज दरानं बँकांना कर्ज देते त्या दरांला रेपो रेट असं म्हणतात. रेपो रेट कमी झाल्यानं बँकांना कमी दरात कर्ज मिळेल आणि ते हा फायदा ग्राहकांना देत ग्राहकांचा व्याज दर कमी करु शकतात. आरबीआयच्या या निर्णयानंतर हृह, वाहन कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारात अनेक जणं कर्ज घेतील.

व्याजदर कपातीनं मोठा फायदा

महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रेपो रेट वाढवणं आणि कमी करण्याचा निर्णय आरबीआयच्या वतीनं घेण्यात येतो. नव्या रेपो रेटच्या कपातीनंतर बँका कर्ज स्वस्त करण्याची शक्यता आहे. 20 वर्षांसाठी 20 लाख कर्ज घेतलेल्यांना या निर्णयामुळे 1.48 लाखांचा फायदा होईल, तर 30 लाख कर्ज घेतलेल्यांना 2.22 लाखांचा फायदा होणार आहे. अर्थव्यवस्थेला या निर्णयामुळे गती येणार असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

ताज्या बातम्या