MP Breaking News
Sat, Dec 13, 2025

फेसटाईम कॉलमुळे निलेश चव्हाण अडकला जाळ्यात; नेपाळमध्येच पोलिसांनी पकडलं

Written by:Smita Gangurde
वैष्णवी हगवणेचं बाळ निलेशकडे होतं. बाळासाठी त्याच्याकडे गेलेल्या कस्पटे कुटुंबाला निलेशने जीवे मारण्याची धमकी दिल्याचीही माहिती आहे.

वैष्णवी आत्महत्या प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणला बेड्या ठोकण्यात त्याच्याच एका मैत्रिणीची मोठी मदत झाल्याचं समोर आलं आहे. फरार झालेला निलेश याच घटस्फोटीत मैत्रिणीसोबत दिल्लीला गेला होता. निलेश तिच्याच फोनचा वापर करीत होता. ही मैत्रिण पुण्यात परतल्यानंतर निलेशचं लोकेशनम ट्रेस झालं. निलेश चव्हाणने वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणात बंदुकीनं कस्पटे कुटुंबाला धमकावलं होतं. दिल्ली ते नेपाळ प्रवासातील निलेशचा एक व्हिडिओ समोर आला. सर्व धागेदोरे जुळल्यानंतर अखेर निलेशला नेपाळमध्ये पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

वैष्णवी आत्महत्या प्रकरणात गुन्हे दाखल झाले आणि अटकसत्र सुरु झाल्यापासून निलेश फरार झाला होता. या काळात त्यानं पोलिसांना कसा गुंगारा दिला हे समोर आलं आहे. ज्या घटस्फोटित मैत्रिणीसोबत निलेश दिल्लीला गेला होता, तिच्याचमुळे निलेशचं लोकेशन ट्रेस करणं पोलिसांना शक्य झालं.

मैत्रिणीच्या फेसटाईम कॉलमुळे अडकला जाळ्यात…

मिळालेल्या माहितीनुसार, फिरण्याच्या बहाण्यानं घटस्फोटीत मैत्रिणीसोबत निलेश दिल्लीत होता. तिथं असताना निलेशकडून मैत्रिणीच्या फोनचा वापर करण्यात आला होता. पोलिसांच्या देखरेखीत असलेल्या एका मोबाईल नंबरवर निलेशच्या मैत्रिणीच्या नंबरवरुन फोन जात होते. पोलिसांना मोबाईल नंबर मिळाल्यानंतर, निलेश दिल्लीत असल्याचं उघड झालं. दिल्लीतून निलेश गोरखपूरकडे गेला आणि मैत्रीण पुण्यात परतली. पुण्यात पोलिसांच्या चौकशीत निलेश गोरखपूरला गेल्याची माहिती होती. नेपाळमध्ये गेल्यानंतर सिम कार्ड घेत अॅपल फोनमधून निलेशचा फेसटाईम कॉल केला. आयपी अॅड्रेसवरुन नेपाळमधील लोकेशन पोलिसांकडून ट्रेस झालं आणि मैत्रीण आणि फेसटाईम कॉलमुळे निलेश पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

घटस्फोटीत मैत्रिणीचा वैष्णवी प्रकरणाशी संबंध नाही…

निलेशच्या घटस्फोटीत मैत्रिणीची पिंपरी चिंचवड पोलिसांनी चौकशी केली. मात्र तिचा वैष्णवी प्रकरणाशी संबंध नसल्याचं समोर आल्यानंतर तिला सोडून देण्यात आलं. या प्रकरणात पोलीस तपास करत आहेत. चौकशीत योग्य ते समोर येईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. निलेश चव्हाणच्या कर्वेनगर घराची पोलिसांनी झाडाझडती घेतली. यात त्याच्या घरातून तीन मोबाइल हस्तगत करण्यात आले. हे मोबाइल वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांचे आहेत. हे मोबाइल आहेत. निलेश चव्हाणला ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्याचे कॉल रेकॉर्डही पोलीस तपासणार आहेत. निलेशचा या आत्महत्या प्रकरणात काय सहभाग होता, तसंच या प्रकरणातील आणखी काही धक्कादायक माहितीही त्याच्या चौकशीत समोर येण्याची शक्यता आहे.