नवी दिल्ली – भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कोणतेही वाद नाहीत, असं सरसंघचलाक मोहन भागवत यांनी स्पष्ट केलंय. केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपा सरकारसोबत यापूर्वीच्या सरकारशीही संघाचे चांगले संबंध राहिले आहेत, असंही त्यांनी सांगितलंय.
सरकारच्या निर्णयांच्या प्रश्नावंरही मोहन भागवत यांनी उत्तर दिलंय. सरकारमध्ये सर्व काही संघ ठरवतो, हे म्हणणं चुकीचं ठरेल असं मोहन भागवत म्हणाले आहेत. संघ सल्ला देतो, मात्र निर्णय केंद्रात असलेले भाजपाचे नेते घेतात असंही त्यांनी सांगितलं. आम्ही जर ठरवत असतो तर इतका वेळ लागला नसता असंही ते म्हणालेते.

पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांना तरुंगात पाठवण्याच्या विधेयकावरही सरसंघचालकांनी मत व्यक्त केलंय. देशातील नेतृत्व आणि नेत्यांची प्रतिमा स्वच्छ असायला हवी असं संघाचं मत आहे, मात्र याबाबत कायदा असावा का, याचा निर्णय संसद घेईल असं मोहन भागवत म्हणालेत.
मोहन भागवत यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
१. तांत्रिक आणि शिक्षण धोरण-
तांत्रिक शिक्षणाचा विरोध नाही, मात्र नव्या तांत्रिक पद्धतीचा सदुपयोग व्हायला हवा. आपल्या देशात परदेशी शिक्षण आणण्यात आलं, यआतून आपण इंग्रजांचे गुलाम झालो. नव्या शिक्षण शोरणात पंचकोशीय शिक्षणाची धारणा ठेवण्यात आलेली आहे. यात कला, खेळ, योग, संस्कृती यांचा समावेश आहे. इंग्रजी ही केवळ एक भाषा आहे, भाषा शिकण्याबाबत समस्या उद्भवण्याची गरज नाही. इंग्रजीसाठी हिंदी सोडायला नको, भारताला समजून घ्यायचं असेल तर संस्कृतचं ज्ञानही आवश्यक आहे.
२. इतर राजकीय पक्षांशी संबंध
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ज्यावेळी संघाच्या व्यासपीठावर आले त्यावेळी त्यांच्या मनात संघाबाबत असलेले गैरसमज दूर झाले. इतर राजकीय पक्षांचेही असेच मन परिवर्तन घडू शकतात. चांगल्या कामासाठी जे मदत मागतात त्यांना मदत केली जाते. आणि जर आम्ही मदत करण्यासाठी गेलो आणि त्यांनी मदत नको असेल तर त््यांना मदत दिली जात नाही.
३. भाजपा सरकारशी संबंध
संघाचे केवळ भाजपा सरकारशीच नाही तर आधीच्या सरकारांशीही चांगले संबंध राहिलेत. आमच्यात मतभेद असू शकतात, मनभेद नाहीत. सरकारमध्ये सगळं काही संघ ठरवतो, हे म्हणणं चुकीचं आहे. आम्ही सल्ला देतो, निर्णय ते घेतात. आम्ही ठरवत असतो तर इतका वेळ लागला नसता.
४. बदलत्या लोकसंख्येबाबत
देशातील बदलत्या लोकसंख्येबाबत संघाला चिंता वाटते. लोकसंख्या बदलल्यानं देशाची फाळणी होते. लोकसंख्या जास्त असण्यापेक्षा हेतू काय आहे, याबाबत चिंता करण्याची गरज आहे. धर्म ही प्रत्येकाची निवड आहे. लोभ आणि अमिषांपोठी धर्म बदलता कामा नये. हे थांबवायला हवं.
५. घुसखोरीबाबत
आपल्या सगळ्यांचे डीएनए एकच आहेत हे सत्य आहे, मात्र देश वेगवेगळे आहेत. युरोपातही असे तीन चार देश आहेत ज्यांचे डीएनए एकच आहेत. डीएनए एकसारखे असण्याचा असा अर्थ नाही की घुसखोरी व्हायला हवी. नियम, कायदे तोडून घुसखोरी होणं चूक आहे. परवानगी घेऊन यायला हवं, घुसखोरी थांबवायला हवी. यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे.











