बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा येथे झालेल्या राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषद पार पडली. यावेळी राज्याचे माजी आमदार आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूबाबत खळबळजनक विधान केले आहे. संभाजी महाराजांना मारण्यासाठी औरंगजेब बदनाम झाला, पण त्यांना त्यांच्याच सासऱ्यांनी मारले, असा दावा बच्चू कडू यांनी केला.
बच्चू कडूंचे वादग्रस्त विधान
शेतकरी नेते बच्चू कडू यांनी रविवारी बुलढाण्याच्या पातुर्डा गावात आयोजित शेतकरी हक्क परिषदेच्या सभा दरम्यान केलेल्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात वतनदारीची पद्धत समाप्त करण्यात आली असल्याचा उल्लेख करत म्हटले की, म्हणे त्या काळात वतनदारीमुळे गुलामशाही, निजामशाही व आदिलशाही चालत होत्या. वतनदारी बंद केल्यामुळे संभाजी महाराज सासऱ्यांकडून मारले गेले; या कारणानेच औरंगजेबाचे नाव बदनाम झाले असावे, असा दावा त्यांनी केला.
नवा वाद निर्माण होण्याची शक्यता
या वतनदारी प्रथेवर बोलताना बच्चू कडू यांनी थेट संभाजी महाराजांचा उल्लेख केला. पहिली वतनदारी बंद केली म्हणून संभाजी राजे सासऱ्यांकडून मारले गेले. नाव औरंगजेबाचं असलं तरी सासरा किती कारणीभूत आहे, हे शोधायला हवं. राजा मरण पत्करायला तयार झाला, पण त्यांनी वतनदारीला साथ दिली नाही, असे बच्चू कडू यांनी सांगितले. बच्चू कडू यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या वक्तव्यावर राजकीय आणि ऐतिहासिक वर्तुळातून काय प्रतिक्रिया येतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.





