Electric two-wheeler fare : राज्यात सदर भाडेदरामध्ये एकसूत्रता, समानता असावी यासाठी राज्य परिवहन प्राधिकरणाने बैठकीत “महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम, २०२५” अंतर्गत राज्यात सेवा देणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांचे भाडेदर निश्चित केले आहे. दरम्यान, परवाना प्राप्त दुचाकी ॲग्रीगेटर धारकांना आता यापुढे राज्य परिवहन प्राधिकरणाने १८ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या बैठकीत निश्चित केलेल्या भाड्याप्रमाणे भाडे आकारणी करणे बंधनकारक असणार आहे.
राज्य शासनाने ०४ जुलै २०२५ रोजीच्या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र बाईक-टॅक्सी नियम, २०२५ लागू केले आहे. मोटार वाहन अधिनियम, राज्य परिवहन प्राधिकरण यांची २७७ वी बैठक अपर मुख्य सचिव, गृह विभाग (परिवहन) तथा अध्यक्ष, राज्य परिवहन प्राधिकरण यांच्या अध्यक्षतेखाली १८ ऑगस्ट २०२५ रोजी झाली होती.

प्रति किमी १०.२७ रुपयेप्रमाणे भाडे आकारणी
दरम्यान, ॲग्रीगेटर बाईक टॅक्सीचा पहिला टप्पा १.५ कि.मी. असल्यामुळे पहिल्या टप्याचे भाडे १५ रुपये असेल व त्यानंतर पुढील प्रत्येक किलोमीटर दराप्रमाणे आकारणी करण्यात येईल. “महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम, २०२५” अंतर्गत राज्यात सेवा देणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांचे भाडेदर राज्यात प्रथमतः करण्यात येत आहेत. राज्यात सदर भाडेदरामध्ये एकसूत्रता, समानता असावी यासाठी राज्य परिवहन प्राधिकरणाने बैठकीत महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम, २०२५” अंतर्गत राज्यात सेवा देणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांचे भाडेदर प्रति कि.मी. १०.२७ रुपयेप्रमाणे आकारणी करण्यास मान्यता दिली. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली आहे.
मुंबई महानगर क्षेत्राकरीता परवान्यास मान्यता
दुसरीकडे अर्जदाराकडून ३० दिवसाच्या आत सर्व अटींची पूर्तता झाल्यानंतर पक्का परवाना प्रदान करण्याच्या अंतिम मान्यतेसाठी राज्य परिवहन प्राधिकरणासमोर सादर करण्याचे निर्देश प्राधिकरणाने दिले, असे अपर परिवहन आयुक्त यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. तसेच राज्य परिवहन प्राधिकरणाने या बैठकीत मे. उबेर इंडिया सिस्टीम प्रा.लि, मे. रोपेन ट्रान्सपोर्टशन सव्हिसेस प्रा.लि, मे. ॲनी टेक्नोलॉजीसेस प्रा.लि यांना ३० दिवसाकरीता “मुंबई महानगर क्षेत्राकरीता” Provisional Licence जारी करण्यास मान्यता दिली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली आहे.











