मनोज जरांगे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदार, खासदारांमध्ये सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजुंच्या नेत्यांचा समावेश आहे. यातील काही आमदार, खासदार तर थेट मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी झाले आहेत, तर काहींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येनं सहभागी व्हा असं आवाहन केलं आहे.
जरांगेंना पाठिंबा दर्शविणारे लोकप्रतिनिधी
चार सत्ताधारी आमदारांनी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे, त्यामध्ये प्रकाश सोळंके, राष्ट्रवादी अजित पवार गट, विजयसिंह पंडित, राष्ट्रवादी अजित पवार गट, आमदार राजू नवघरे राष्ट्रवादी अजित पवार गट, आणि विलास भुमरे शिवसेना शिंदे गट या आमदारांचा समावेश आहे. तर विरोधी पक्षातील तीन खासदार आणि दोन आमदारांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यामध्ये आमदार संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादी शरद पवार गट, आमदार कैलास पाटील शिवसेना ठाकरे गट या दोन आमदारांचा आणि खासदार बजरंग सोनवणे, राष्ट्रवादी शरद पवार गट, खासदार ओमराजे निंबाळकर खासदार शिवसेना ठाकरे गट आणि खासदार संजय जाधव शिवसेना ठाकरे गट या खासदारांचा समावेश आहे.
यापैकी प्रकाश सोळंके हे या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत, त्यांनी आपला या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार संदीप क्षीरसागर हे देखील या आंदोलनात सहभागी झाल्याचं पहायला मिळालं. तर दुसरीकडे आमदार विजयसिंह पंडित यांनी आपल्या मतदार संघात या आंदोलनाच्या समर्थनार्थ मोठे पोस्टर लावल्याचं पहायला मिळालं.
आता माघार नाही; जरांगेंची भूमिका
जरांगे पाटील यांनी मोठी मागणी करत म्हटले की, मागण्या मान्य होईपर्यंत आम्हाला परवानगी द्यावी. गोळ्या झाडल्या तरीही आता आम्ही मागे हटणार नाहीत. आज रात्री शंभर टक्के आम्ही आझाद मैदानावर पोहोचणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. सरकारचे शिष्टमंडळ चर्चेसाठी पोहोचण्याच्या अगोदरच मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाबाबतची त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबईमध्ये आंदोलन करण्याच्या भूमिकेवर ते अजूनही ठाम आहेत.
मुख्यमंत्र्यांनी चर्चेची दारे उघडली!
दरम्यान आता यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील मनोज जरांगेंसोबत चर्चा करण्यासाठी सकारात्मकता दर्शविली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांना शांततेच्या मार्गाने सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकारी आहे, असे म्हटले आहे. शिवाय, यामध्ये मराठा समाजाचे आजवर अनेक प्रश्न मार्गी लावल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी मांडले. त्यामुळे जरांगे मुंबईत गेल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये थेट काही चर्चा घडते का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.





