ज्येष्ठ नेते आणि राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांच्या मतदार संघात शोककळा पसरली. राज्यातील अनेक नेत्यांनी शिवाजीराव कर्डिले यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार शिवाजीराव कर्डीले यांना श्रद्धांजली वाहिली. या घटनेवर प्रतिक्रिया देताना मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील भावूक झाले.
राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले…
भाजपाचे जेष्ठ नेते आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि भाजपा परिवारासाठी वेदनादायी आहे. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक जीवनाच्या वाटचालीतील एक दिलखुलास मित्र काळाच्या पडद्याआड गेला असल्याची भावना जलसंपदा तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
आपल्या शोकसंदेशात मंत्री विखे पाटील यांनी म्हटले की, आमदार शिवाजीराव कर्डीले शुक्रवारी पंडित प्रदिपकुमार मिश्रा यांच्या दर्शनासाठी माझ्या लोणी येथील निवासस्थानी आले होते. एकत्रित आम्ही जेवणही केले. अतिशय मनमोकळ्या गप्पाही मारल्या. परंतू अचानक असे वृत्त येणे याचे मनस्वी दु:ख व्यक्तिगत मला झाले आहे. जिल्ह्याच्या राजकारणात एक प्रभावी नेता म्हणून कर्डीले यांची ओळख होती. सरपंच पदापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. तब्बल २५ वर्षांची त्यांची आणि माझी मैत्री राहीली, कधी मतभेदही झाले.
परंतू मनामध्ये कटूता नव्हती. एक संवेदनशिल व्यक्तिमत्व म्हणून प्रत्येक प्रश्नासाठी त्यांचा व्यक्तिगत पाठपुरावा असायचा. जिल्हा तसेच राहुरी तालुक्यातील शेती आणि सिंचनाच्या प्रश्नासाठी त्यांची नेहमीच आग्रही भूमिका राहिली असल्याचं राधाकृष्ण विखे यांनी सांगितलं.
शिवाजीराव कर्डीलेंच्या निधनामुळे शोक
आमदार कर्डीले यांच्या निधनामुळे जनसामान्यांशी नाळ जोडलेले, तळागाळातील घटकांच्या विकासासाठी साठी झटणारे नेतृत्व हरपले. ग्रामीण भागाची नाडी माहित असणारे, सहकार चळवळीच्या माध्यमातून सक्रिय अशा आमदार कर्डीले यांनी राहुरी मतदार संघ आणि अहिल्या नगरच्या विकासाचा सदैव ध्यास घेतला. ज्येष्ठ नेते आमदार शिवाजीराव कर्डीले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असे, मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.





