Nana Patekar: कट्टर पांरपरिक प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात आज टी-20 आशिया कप 2025 स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना होणार आहे. आशिया कप 2025 स्पर्धेतील सहाव्या सामन्यात ए ग्रुपमधील 2 कट्टर संघ आमनेसामने असणार आहेत. आज (रविवारी 14 सप्टेंबरला) महामुकाबला होणार आहे. दरम्यान भारत-पाकिस्तान मॅचला विरोधकांकडून विरोध होत असताना आणि उबाठा गटाकडून राज्यभर आंदोलन केले जात असताना, आता या सामन्याला प्रसिद्ध अभिनेते नाना यांनी या सामन्यावर भूमिका घेत, भारत-पाकिस्तान मॅचला विरोध केला आहे. ‘नाम फाऊंडेशन’ला नुकतेच 10 वर्षं पूर्ण झाली. पुण्यात झालेल्या या दशकपूर्ती सोहळ्यात ते बोलत होते.
अशा लोकांसोबत का खेळावे?
दरम्यान, ‘नाम फाऊंडेशन’ला १० वर्षं पूर्ण झाली. पुण्यात झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे, उदय सामंतही उपस्थित होते. दरम्यान, नाम फाऊंडेशनचे काम श्रेयवासाठी नाही. असं नाना पाटेकर म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी भारत विरुद्ध पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्यावरही आपले मत मांडले. “माझ्या मते, भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट मॅच खेळूच नये. माझ्या लोकांचे रक्त सांडले आहे त्यांच्याशी का खेळावे? सरकारचे धोरण काय असावे माहिती नाही.” पण मला वाटते ज्यांना आपणाला मारलं, त्यांच्यासोबत क्रिकेट नको, असं परखड मत नाना पाटेकर यांनी मंत्र्यांसमोर मांडले.

म्हणून चळवळ सुरु केली
फाऊंडेशन म्हणजे माणसांनी माणसांसाठी सुरू केलेली एक चळवळ आहे. या फाऊंडेशनच्या माध्यमातून ६० लाख शेतकरी बांधवांना फायदा झाला. अनेक शेतकऱ्यांच्या फायद्याची कामे ‘नाम’तर्फे झाली आहेत. नाना पाटेकर म्हणाले की, ‘नाम फाऊंडेशन’ला १० वर्षं पूर्ण झाल्याचा त्यांना खूप आनंद आहे. माझ्यापेक्षा मकरंद गावगाड्यात खूप फेमस आहे. त्याची गावाशी नाळ जोडलेली आहे. समाजाला आपण काहीतरी देणे लागतो, म्हणून आम्ही ही चळवळ सुरू केली असल्याचे नाना पाटेकर यावेळी म्हणाले.
दरम्यान, नाना पाटेकरांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या क्रिकेट सामन्यावरही आपले वैयक्तिक मत मांडत त्यांनी सरकारच्या धोरणांवरही अप्रत्यक्षरित्या टिका केली आहे. यावेळी अभिनेते मकरंद अनासपुरे उपस्थित होते.











