नाशिकमध्ये नोटांची छपाई करणाऱ्या प्रेसमध्ये काही जणांनी फसवणूक करत मिळवली नोकरी; अखेर कारनामा उघड

खोटी कागदपत्रे दाखवत नाशिकच्या नोट प्रेसमध्ये नोकरी मिळविणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. संबंधित आरोप परराज्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे.

देशासाठी चलनी नोटांची छपाई करणाऱ्या नाशिकमधील नोट प्रेसमध्ये बिहारमधील सात जणांनी फसवणूक केल्याची घटना ताजी असतानाच खोटी कागदपत्रे सादर करून नोकरी मिळविणाऱ्या आणखी एका संशयिताचे नाव समोर आले आहे. त्याचे सर्व कारनाने उघड झाले असून त्याच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी नोट प्रेस आणि पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

खोटी प्रमाणपत्रे दाखवून मिळविली नोकरी

आरोपी विवेक सुरेशपालसिंग पनवर (वय ३२, रा. पट्टी बोगन, जीएसआय कॉलेजजवळ, बागपत, उत्तर प्रदेश, सध्या रा. सिद्धेश्वरनगर, पिंटो कॉलनी मागे, जेलरोड) असे या संशयित प्रेस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याने डिप्लोमा इन इंजिनीअरिंगचे (प्रिंटिंग) खोटे प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळविल्याचे समोर आले आहे. 2022 – 23 मध्ये डमी परीक्षार्थी संशयित रवी रंजन कुमार, संदीप कुमार, शिशुपाल कुमार, आयुष राज, राजीव सिंग, संदीप कुमार व आशुतोष कुमार (सर्व रा. नालंदा, बिहार) यांनी काही उमेदवारांची शैक्षणिक बनावट कागदपत्रे तयार करून प्रेसमध्ये नोकरी मिळविल्याचे तपासात उघड झाले होते. त्यानंतर आता आणखी एक असा प्रकार उघडकीस आला आहे.

प्रकरण उघडकीस नेमके कसे आले?

पर्यवेक्षक या पदांसाठी मार्च २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत पवई येथील आयटी पार्कलगतच्या केंद्रात भरती परीक्षा घेतली होती. त्यात संशयित सात जणांनी डमी परीक्षार्थींना केंद्रावर पाठवले. त्यांनी उमेदवारांच्या जागी परीक्षा दिली आणि उत्तीर्ण होऊन गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवली. त्यांनी अंतिम परीक्षा व निवड प्रक्रियेत बनावट आयटीआय संस्थेचे प्रमाणपत्र, डिप्लोमा इन इंजिनीअरिंग इलेक्ट्रिकलचे प्रमाणपत्र सादर केले. प्रेसने नियमित तपासणी केली असता काही उमेदवारांची कागदपत्रे संशयास्पद आढळली. अंतर्गत चौकशीत फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सुरू झालेल्या चौकशीत आता अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत.


About Author

Rohit Shinde

Other Latest News