Maharashtra Government – सध्या नेपाळमध्ये मोठा हिंसाचार होत आहे. तिथली सामाजिक आणि राजकीय परिस्थिती पूर्ण बिघडली आहे. त्यामुळं तिथं जे महाराष्ट्रातील पर्यटक अडकले आहेत. त्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. नेपाळमधील राजकीय अस्थिरता आणि त्यामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तिथं अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरुप परत आणण्यासाठी राज्यसरकार युध्दपातळीवर प्रयत्न करत आहे.
याकरिता नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून संवाद साधत त्यांना दिलासा दिला. या सर्व पर्यटकांना महाराष्ट्रात सुखरुप आणण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करीत असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी पर्यटकांना दिली.

मुरबाड तालुक्यातील पर्यटक जास्त
दरम्यान, राज्यातील मुरबाड तालुक्यातील पर्यटक मोठ्या संख्येने अडकले असून, त्यांच्याशी देखील एकनाथ शिंदे यांनी मोबाईलवरून संवाद साधला. आणि त्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी राज्य शासन केंद्र शासनाच्या मदतीने प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज्यातील सुमारे १५० पर्यटक नेपाळमध्ये अडकले असून त्यातील काहींशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. नेपाळमधील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेल्या पर्यटकांच्या समूहाशी संवाद साधत त्यांना उपमुख्यमंत्र्यांनी दिलासा दिला आहे. तसेच त्यांना लवकरच परत आणू, असा विश्वास दिला आहे.
पर्यटकांना सुखरुप परत आणण्यास प्राधान्य – पवार
राज्यातील ठाणे, पुणे, मुंबई, लातूर, कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे १०० पर्यटक नेपाळमध्ये अडकले असल्याची माहिती आतापर्यंत प्राप्त झाली आहे. त्याव्यतिरिक्त बीड जिल्ह्यातून गेलेले पर्यटक रस्ता मार्गे खाजगी वाहनाने परत यायला निघालेले असून ते उत्तर प्रदेशात गोरखपूरपर्यंत पोहोचले आहेत. सर्वाधिक पर्यटक ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील आहेत. अडकलेल्या पर्यटकांना आवश्यक ती मदत करण्यासाठी राज्य शासन तत्पर असून त्यांच्याशी संपर्क साधून आहे. सर्व पर्यटक सुरक्षित आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
नेपाळमध्ये अडकलेल्या प्रत्येक पर्यटकाला सुरक्षितपणे घरी परत आणणे आणि त्यांच्या कुटुंबांना दिलासा देणे हीच प्राथमिकता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.











