BJP : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाची राजकीय पक्षांकडून जय्यत तयारी आणि रणनिती केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून आज (मंगळवारी) रोजी सायंकाळी 6 वाजता वरळीतील एनएससीआय डोममध्ये भाजपा भव्य शक्तिप्रदर्शन करीत मुंबई पालिकेच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहे. देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेवर सत्तास्थापनेसाठी गेली अनेक वर्षं शिवसेना (आता उबाठा गट) आणि भाजपात चुरस आहे. यंदा, शिवसेनेच्या दसरा मेळाव्याआधीच भाजपानं विजय संकल्प मेळावा आयोजित करून रणशिंग फुंकलं आहे.
मुंबईची सुरक्षा, विकास – हेच एक मिशन
मुंबईतील पायाभूत सुविधा, सुरक्षा, स्वच्छता आणि शहरी व्यवस्थापन या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत, “मुंबईची सुरक्षा, मुंबईचा विकास – हेच एक मिशन” या त्रिसूत्रीचा उद्घोष या मेळाव्यातून करण्यात येणार आहे. दरम्यान, “चला मुंबईत परिवर्तन घडवूया!” अशी टॅगलाईन देत, भाजपानं विजय संकल्प मेळाव्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या मेळाव्यात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, तसंच मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम हे प्रमुख नेते मार्गदर्शन करणार आहेत.

मुंबईत परिवर्तन घडविण्यासाठी विजय मेळावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘विकासवाद’ आणि मुख्यंमंत्री फडणवीस यांच्या ‘कार्यक्षम नेतृत्वा’वर भर देत भाजपा मुंबईकरांचा विश्वास मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. “हा मेळावा केवळ निवडणूक प्रचाराचा प्रारंभ नसून, मुंबईकरांना एकजुटीनं परिवर्तनासाठी पुढं आणण्यासाठी आहे. मुंबईला अधिक सुरक्षित, सुंदर आणि समृद्ध बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. दरम्यान, मुंबईकरांना गेल्या 25 हून अधिक वर्षांच्या भ्रष्ट कारभारापासून मुक्ती देण्याकरता मुंबईत परिवर्तन घडविण्यासाठी हा मेळावा असल्याचं भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी म्हटलं आहे.
तसेच या मेळाव्यातून आम्ही मुंबईकरांच्या अपेक्षा आणि आकांक्षा जाणून घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी ठोस पावले उचलू असंही साटम म्हणालेत.











