प्रबोधिनी एकादशीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला कार्तिक एकादशी म्हणतात. या एकादशीला प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठणी एकादशी असेही म्हणतात. आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो आणि कार्तिकी एकादशीने चातुर्मासाची सांगता होते. यानंतर विवाह मुहूर्त आणि मंगल कार्य देखील सुरू होतात. त्यामुळे कार्तिकी एकादशीला अतिशय महत्त्व आहे.
कार्तिकी एकादशीचे महत्त्व
कार्तिकी एकादशीला ‘प्रबोधिनी एकादशी’ किंवा ‘देवउठनी एकादशी’ असेही म्हणतात, कारण या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो. या दिवशी व्रत, उपवास, आणि विष्णू-तुळशी विवाह केला जातो, तसेच पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी होते. या एकादशीने चातुर्मासाचा काळ संपतो आणि शुभ कार्यांची सुरुवात होते. या दिवशी व्रत आणि उपवास केल्याने सर्व सांसारिक सुखांचा उपभोग मिळून शेवटी मोक्षप्राप्ती होते, असे मानले जाते.

पूजेची पद्धत
- कार्तिकी एकादशीला, सकाळी लवकर उठून ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी स्नान करावे.
- त्यानंतर, स्वच्छ, पिवळे कपडे परिधान करावेत, कारण हा रंग भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे.
- त्यानंतर, हातात पाणी आणि अक्षता घेऊन विधीचा संकल्प करावा.
- भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करावी. पूजेदरम्यान भगवान विष्णूला पिवळी फुले, हार आणि पिवळे चंदन अर्पण करा.
- त्यानंतर, तुपाचा दिवा आणि धूप लावा आणि भगवान विष्णूची पूजा करा.
- शक्य असल्यास फळाहार किंवा निर्जळी उपवास करावा.
- पूजेदरम्यान विष्णू चालीसा, एकादशी व्रत कथा, श्री विष्णू स्तोत्र आणि विष्णू मंत्रांचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते.
- विष्णूसह देवी-देवतांची पूजा करून नैवेद्य दाखवावा.
- एकादशीला तुळशीची पाने तोडू नयेत; आवश्यक असल्यास ती आदल्या दिवशीच तोडून ठेवावीत.
- द्वादशी तिथीला सूर्योदयानंतर पारण करून उपवास सोडावा.
- वृद्ध आणि गरजू ब्राह्मणांना अन्नदान करणे शुभ मानले जाते.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











