महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या दरांमध्ये सध्या कमालीचा असमतोल पाहायला मिळतोय. एकीकडे हळीच्या दरात चांगली तेजी पाहायला मिळत आहे. मात्र आवक वाढल्याने आणि मालाची ढासळलेली प्रत यामुळे कांदा आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच निराशा होताना दिसत आहे. सोमवार, दिनांक 24 नोव्हेंबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेला माल आणि मिळालेले अशा महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ.
सोयाबीन उत्पादकांना दिलासा नाहीच !
राज्याच्या मार्केटमध्ये 79 हजार 547 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. यापैकी लातूर मार्केटमध्ये 20 हजार, 284 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 4058 ते 4639 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच वाशिम मार्केटमध्ये आवक झालेल्या 3000 क्विंटल पिवळ्या सोयाबीनला प्रतीनुसार 4128 ते 5350 रुपये प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला.

महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादकांच्या अडचणी चांगल्याचा वाढत आहेत. कारण बाजार समित्यांमध्ये सध्या सोयाबीनचे आवक नियमित नसल्याने कधी माल जास्त येतो तर कधी कमी, यामुळे बाजारभावामध्ये कमालीची अस्थिरता सध्या पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी 7 हजारांच्या पार पोहोचलेला दर आता 5 हजारांच्या आत आल्याचे दिसते. परिणामी शेतकऱ्यांमध्ये सध्या कमालीची चिंता पाहायला मिळत आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांची निराशा
राज्याच्या मार्केटमध्ये 1 लाख, 76 हजार 405 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 91 हजार 073 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 313 ते 1455 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 14 क्विंटल कांद्यास सर्वसाधारण 2310 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक चांगलीच वाढताना दिसत आहे. याचा फटका आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. कारण, दरांमध्ये घसरण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खरंतर एकीकडे राज्यामध्ये कांद्याच्या मागणीत वाढ जरी झाली असला तरी दुसरीकडे आवक देखील तेवढीच वाढत आहे. परिणाम कांद्याच्या दरामध्ये कोणतीही लक्षवेधी सुधारणा होताना दिसत नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.
बाजार समित्यांमध्ये हळदीला उठाव
बहुतांश बाजार समित्यांमध्ये हळदीला मात्र चांगला उठाव असल्याचे पाहायाल मिळत आहे. राज्याच्या कृषी मार्केटमध्ये आज एकूण 1612 क्विंटल हळदीची एकूण आवक झाली. यापैकी हिंगोली मार्केटमध्ये आवक झालेल्या 1400 हळदीस 12050 ते 14050 दरम्यान बाजारभाव मिळाला. तसेच सांगली मार्केटमध्ये आवक झालेल्या 192 राजापुरी हळदीस 11550 ते 15850 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला.











