पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वात पवित्र आणि प्राचीन मंदिरांपैकी एक मानले जाते. भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या या मंदिराचे धार्मिक महत्त्व अत्यंत मोठे आहे. भगवान विठ्ठल आणि रुख्मिणी यांच्या दर्शनासाठी राज्यभरातून तसेच देशभरातून लाखो भक्त येथे येतात. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला तर येथे लाखो वारकरी पायी चालत येतात, ज्यामुळे पंढरपूर संपूर्णपणे भक्तिमय वातावरणाने भरून जाते. शिवाय डिसेंबर-जानेवारी महिन्यात देखील विठुरायाचा दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. डिसेंबर महिन्याच्या शेवटी आणि नववर्षाच्या सुरुवातीला सुट्ट्यांचा हंगाम असतो. त्यामुळे,भाविकांची देवदर्शनासाठी मोठी गर्दी होत असल्याचं पाहायला मिळतं. या परिस्थितीत सर्वसामान्य भक्तांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी मंदिर समितीने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
पंढरपुरात 10 दिवस विठुरायाचे VIP दर्शन बंद
डिसेंबर महिन्याच्या शेवटी आणि नववर्षाच्या सुरुवातीला सुट्ट्यांचा हंगाम असतो. त्यामुळे,भाविकांची देवदर्शनासाठी मोठी गर्दी होत असल्याचं पाहायला मिळतं. महाराष्ट्रातील श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी, तुळजापूर, अक्कलकोट, कोल्हापूर आणि पंढरपुरातही देवदर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. सध्या डिसेंबर महिना सुरू झाल्यापासून पंढरपुरात दररोज तोबा गर्दी होऊ लागली आहे. त्यातच आता नाताळाच्या सुट्ट्या सुरू होणार असल्याने भाविकांनी पर्यटकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

भाविकांच्या वाढत्या गर्दीचा अंदाज घेऊन पंढरपूर मंदिर समितीने 21 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत देवाचे व्हीआयपी दर्शन, टोकन दर्शन आणि ऑनलाइन दर्शन पूर्णपणे बंद केले आहे. 21 ते 31 डिसेंबर म्हणजेच पुढील 10 दिवस भाविकांना मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी केवळ दर्शनरांगेतूच जावे लागणार आहे. मंदिर समितीने हा निर्णय घेतला असून या निर्णयाचे स्वागत होत आहे. जास्तीत जास्त भाविकांना कमीत कमी वेळेत दर्शन देण्यासाठी देवाच्या पाद्यपूजा देखील 10 दिवसांच्या या कालावधीमध्ये बंद ठेवण्याचा निर्णय समितीकडून घेण्यात आला आहे.
विठुरायाच्या दर्शनाला भक्तांची सातत्याने गर्दी
विठुरायाच्या दर्शनाला भक्तांची सातत्याने गर्दी होत असते, कारण पंढरपूर हे महाराष्ट्रातील भक्तीचं प्रमुख तीर्थस्थान मानलं जातं. वर्षभर येथे राज्यभरातून आणि देशभरातून भाविक मोठ्या श्रद्धेने येतात. विशेषतः शनिवार, एकादशी, तसेच उत्सव काळात मंदिर परिसरात प्रचंड गर्दी होते. वारकरी परंपरेमुळे पंढरपूरला एक वेगळंच आध्यात्मिक स्थान लाभलं आहे. भक्त तासन्तास रांगेत उभे राहूनही विठुरायाच्या दर्शनासाठी उत्सुक असतात. प्रशासनाकडून वेळोवेळी गर्दी नियोजनासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातात. तरीही भाविकांची विठुरायावरची भक्ती आणि प्रेम अखंड असल्याने दररोज मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे गर्दीच्या नियंत्रणासाठी मंदिर समिती अनेक निर्णय घेत असते.











