Sankashti Chaturthi 2025 : आज संकष्टी चतुर्थी, चंद्रोदय कधी? जाणून घ्या पुजा विधी आणि महत्त्व

Asavari Khedekar Burumbadkar

हिंदू धर्मानुसार, जेव्हा जेव्हा एखाद्या कामाची सुरूवात केली जाते, तेव्हा प्रथम भगवान गणेशाची प्रार्थना केली जाते. ज्याप्रमाणे आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतो, त्याचप्रमाणे दर महिन्याला येणारी चतुर्थी तिथी भगवान गणेशाला समर्पित असते. या दिवशी उपवास आणि पूजा करून भक्त गणेशाची कृपा मिळवण्याचा प्रयत्न करतात. संकष्टी चतुर्थीला, भक्त उपवास करतात आणि रात्री चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर उपवास सोडतात. 

संकष्टी चतुर्थीचे महत्त्व

संकष्टी चतुर्थी गणपतीला समर्पित आहे, जो विघ्नहर्ता म्हणून ओळखला जातो. या दिवशी पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती येते. या दिवशी, भक्त भगवान गणेशाची पूजा करतात आणि त्यांच्यासाठी उपवास करतात. संकष्टी चतुर्थी, ज्याचा अर्थ ‘संकट दूर करणारी चतुर्थी’ असा आहे, गणेशाला समर्पित आहे. या दिवशी, स्त्रिया विशेषत: आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखासाठी प्रार्थना करतात. 

संकष्टी चतुर्थी तिथी 

वैदिक पंचांगानुसार, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजून 32 मिनिटांनी सुरू होईल. या तिथीची समाप्ती 9  नोव्हेंबर रोजी सकाळी 4 वाजून 25 मिनिटांनी होईल. त्यामुळे, उदय तिथीनुसार संकष्टी चतुर्थीचे व्रत 8 नोव्हेंबर रोजी केले जाईल.

चंद्रोदयाची वेळ

दिवसभर उपवास केल्यानंतर संध्याकाळी चंद्राची पूजा केली जाते आणि अर्घ्य अर्पण केले जाते. रात्री 7 वाजून 50 मिनिटांनी चंद्रोदयाची वेळ आहे. या दिवशी चंद्रोदयाचे विशेष महत्व असते. जोपर्यंत चंद्र दिसत नाही तोपर्यंत व्रत सोडता येत नाही. तसेच चंद्रोदयाच्या वेळेनंतर चंद्राला अर्घ्य देण्याची परंपरा आहे. या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी चंद्राला अर्घ्य दिल्यास व्रत पूर्ण मानले जाते अशी मान्यता आहे.

संकष्टी चतुर्थी पूजा विधि

  • या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. त्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे.
  • त्यानंतर घरातील पूजागृह किंवा देव्हारा हा गंगाजलाने शुद्ध करावा. तेथे लाल कापड पसरावे.
  • त्यानंतर देव्हाऱ्यात गणरायाची छोटी मूर्ती असल्यास ती स्थापित करावी.
  • यानंतर, हातात पाणी आणि तांदूळ धरून उपवासाची प्रतिज्ञा घ्या.
  • त्यानंतर विधीनुसार गणपतीला अभिषेक करावा.
  • त्याच्यासमोर तुपाचे निरांजन, उदबत्ती लावावी.
  • गणपतीला अक्षता, लाल फूल (जास्वंद), दूर्वा अर्पण कराव्यात.
  • देवासमोर नैवेद्य दाखवा.
  • श्रीगणेशाच्या मंत्रांचा जप करा.
  • संकष्टी चतुर्थीच्या व्रताची कथाही ऐकू शकता.
  • शेवटी, विधीनुसार गणपतीची आरती करा.
  • त्यानंतर, रात्री चंद्रोदय झाल्यावर आरती करून भोजन करावे.

संकष्टी व्रत मंत्र 

  • ॐ गं गणपते नमः
  • ॐ विघ्नराजाय नमः
  • प्रणम्य शिरसा देवां गौरीपुत्रं विनायकम्।

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

ताज्या बातम्या