हिंदू धर्मात दिवाळी हा सर्वात मोठा सण मानला जातो. यामध्येच दिवाळीच्या पाच दिवसांचं वेगवेगळं महत्त्व आहे. दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशीने होत असली तरी हिंदू धर्मात दिवाळीची सुरुवात वसुबारसने केली जाते. या दिवशी गाय आणि वासराची पूजा करण्याची पद्धत आहे. गायीच्या पोटात 33 कोटी देव आहेत असे मानले जाते. म्हणून गायीची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. वसुबारसचे महत्त्व जाणून घेऊया…
वसुबारसचं महत्त्व काय?
भारतीय संस्कृतीत गाईला मातेचा दर्जा दिला आहे आणि ती पूजनीय मानली जाते. वसुबारस हा दिवस गाई आणि तिच्या वासरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. ‘वसु’ म्हणजे संपत्ती आणि ‘बारस’ म्हणजे द्वादशी तिथी, त्यामुळे या दिवसाला ‘संपत्तीसाठी आलेली द्वादशी’ असेही म्हणतात. घरामध्ये लक्ष्मीचे आगमन व्हावे आणि अनेक जन्मांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात, या हेतूनेही हे व्रत केले जाते.

वसुबारस साजरी करताना गायीची पूजा कशी करावी?
दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेचं वसुबारस या सणापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते. वसुबारस या सणाच्या दिवशी गाय आणि वासरू ह्यांची पूजा केली जाते. गायीच्या पायावर पाणी वाहून गायीला हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ घातली जाते. वासराची देखील तशाच प्रमाणे पूजा केली जाते. निरांजनाने ओवाळून गायीच्या आणि वासराच्या अंगाला स्पर्श केले जाते. यानंतर गाय आणि वासराला गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. यानंतर गायीला प्रदक्षिणा घालून तिच्या पाया पडले जातात. या दिवशी संध्याकाळी घरातील तुळशीपुढे आणि दारात, परिसरात पणत्या लावून रोषणाई करण्याची पद्धत आहे. अशा प्रकारे हा अत्यंत साधा विधीपूर्वक करण्याचा हा दिवस आहे.
काय आहे वसबारसची प्रथा?
या दिवशी घरातील गोधनाची पूजा केली जाते. समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी वासरासहित गायीची पूजा केल्याने अनेक जन्मांच्या कामना पूर्ण होतात आणि दीर्घायुष्य प्राप्त होते.
वसुबारस सण का साजरा करतात?
वसुबारस हा गोमातेबद्दल मानवी जीवनातून कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. घरामध्ये लक्ष्मीचे आगमन व्हावे आणि कुटुंबाचे कल्याण व्हावे यासाठी या दिवशी गायीची पूजा केली जाते.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











