गुरू नानक जयंती हा शीख धर्माचा प्रमुख सण आहे. याला गुरू नानक देव यांचा प्रकाश पर्व असेही म्हणतात. गुरू नानक जयंती दरवर्षी कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. दिवाळीनंतर १५ दिवसांनी गुरू नानक जयंती येते. गुरू नानक हे शीख धर्माचे संस्थापक आणि शीखांचे पहिले गुरू होते. गुरू नानक जयंतीला शीख धर्माला मानणारे लोक भजन-कीर्तन आणि लंगर इत्यादी करतात. या दिवशी गुरुद्वारामध्ये भक्ती आणि सेवा सुरू असते. जाणून घ्या गुरू नानक जयंती कधी आहे…
कधी आहे गुरुनानक जयंती?
दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला गुरुनानक जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. यंदा गुरुनानक जयंती बुधवार, 5 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे.

गुरु नानक जयंती मुहूर्त
कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेची सुरुवात 4 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजून 36 मिनिटांनी होईल आणि या तिथीची समाप्ती 5 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजून 48 मिनिटांनी होईल. यावेळी ब्रह्म मुहूर्त सकाळी 4 वाजून 46 मिनिट ते 5 वाजून 37 मिनिटांपर्यंत असेल, विजय मुहूर्त दुपारी 1 वाजून 56 मिनिट ते दुपारी 2 वाजून 41 मिनिटांपर्यंत असेल, गोधुली मुहूर्त संध्याकाळी 5 वाजून 40 मिनिट ते 6 वाजून 5 मिनिटांपर्यंत असेल.
गुरू नानक जयंतीचे महत्व
गुरू नानक जयंती, ज्याला ‘गुरुपूरब’ किंवा ‘प्रकाश उत्सव’ असेही म्हणतात, हा शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले शीख गुरू, गुरू नानक देव जी यांचा जन्मदिवस आहे. गुरु नानक जयंतीचे शिख धर्मीयांसाठी अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. शीख धर्माचे पहिले गुरू मानले जाणारे गुरू नानक देव यांचे जीवन आणि शिकवण यांचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे. गुरू नानक देव यांनी नेहमीच समानता, प्रेम, सेवा आणि प्रामाणिकपणा या तत्त्वांवर भर दिला. या दिवशी लोक जात-धर्माचा विचार न करता सर्वांप्रती बंधुता आणि सहिष्णुतेची भावना अंगीकारण्याचा संकल्प करतात. गुरु नानक देव यांनी शिकवले की जात, धर्म किंवा लिंग कोणताही असो, प्रत्येक व्यक्ती देवाच्या इच्छेने निर्माण झाली आहे आणि सर्वांना समानतेने वागवले पाहिजे. गुरु नानक जयंती हा त्यांच्या शिकवणींचे स्मरण करण्याचा आणि त्या आचरणात आणण्याचा दिवस आहे.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)