MP Breaking News
Sun, Dec 14, 2025

Pakistan Against Dhurandhar Movie : धुरंदर चित्रपटाची टीम अडचणीत; थेट कोर्टात याचिका दाखल

पीपीपी (पाकिस्तान पीपल्स पार्टी)चे कार्यकर्ते मोहम्मद अमीर यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकेत चित्रपटात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचा फोटो, पीपीपीचा ध्वज तसेच पक्षाच्या रॅलींचे दृश्य कोणतीही अधिकृत परवानगी न घेता वापरण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे
Pakistan Against Dhurandhar Movie : धुरंदर चित्रपटाची टीम अडचणीत; थेट कोर्टात याचिका दाखल

Pakistan Against Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित बहुचर्चित चित्रपट ‘धुरंधर’ वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसत आहे. मध्य पूर्वेतील अनेक देशांमध्ये आधीच या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आल्यानंतर आता पाकिस्तानात थेट कायदेशीर कारवाईची तयारी सुरू झाली आहे. पाकिस्तानातील कराची येथील जिल्हा व सत्र न्यायालयात ‘धुरंधर’विरोधात याचिका दाखल करण्यात आली असून, चित्रपटाशी संबंधित संपूर्ण टीमविरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे.

कोणी दाखल केली याचिका Pakistan Against Dhurandhar Movie

पीपीपी (पाकिस्तान पीपल्स पार्टी)चे कार्यकर्ते मोहम्मद अमीर यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकेत चित्रपटात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचा फोटो, पीपीपीचा ध्वज तसेच पक्षाच्या रॅलींचे दृश्य कोणतीही अधिकृत परवानगी न घेता वापरण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याशिवाय, चित्रपटात पीपीपीला दहशतवादाला पाठिंबा देणारा पक्ष म्हणून दाखवल्याचा दावाही करण्यात आला आहे.

याचिकेत नमूद केल्याप्रमाणे, ‘धुरंधर’च्या ट्रेलर आणि इतर दृश्यांमध्ये पाकिस्तानातील कराची शहरातील ल्यारी परिसराचे चित्रण दहशतवाद्यांचे युद्धक्षेत्र असल्याप्रमाणे करण्यात आले आहे. हे चित्रण पाकिस्तानची बदनामी करणारे, दिशाभूल करणारे आणि देशाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारे असल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे. या माध्यमातून पीपीपी, त्यांचे नेते आणि समर्थकांविरोधात द्वेष पसरवला जात असल्याचेही याचिकेत म्हटले आहे.

कोणाकोणाच्या नावाचा उल्लेख?

या प्रकरणात रणवीर सिंह, संजय दत्त, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, आर. माधवन, सारा अर्जुन, राकेश बेदी यांच्यासह दिग्दर्शक आदित्य धर, निर्माते लोकेश धर आणि ज्योती किशोर देशपांडे यांची नावे थेट याचिकेत नमूद करण्यात आली आहेत. चित्रपटाच्या निर्मितीपासून प्रमोशनपर्यंत सहभागी असलेल्या प्रत्येकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. याचिकेत पाकिस्तान दंड संहितेतील 499, 500, 502, 504, 505, 153-अ आणि 109 या कलमांचा उल्लेख करण्यात आला आहे. ही कलमे बदनामी, समाजात तेढ निर्माण करणे, दंगलीस प्रवृत्त करणे आणि गटांमध्ये शत्रुत्व वाढवण्याशी संबंधित आहेत.

विशेष म्हणजे, ‘धुरंधर’वर याआधीच बहरीन, कुवैत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांसारख्या अनेक मध्य पूर्वेतील देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. या देशांतील सेन्सॉर बोर्डांनी चित्रपटातील आशय पाकिस्तानविरोधी असल्याचे कारण देत प्रदर्शनास नकार दिला होता. आता कराची न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेमुळे ‘धुरंधर’च्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. बंदीपलीकडे जाऊन थेट कायदेशीर लढाईला सामोरे जाण्याची वेळ चित्रपटाच्या संपूर्ण टीमवर येणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.