भारतीय दूरदर्शनवरील ऐतिहासिक महाभारत मालिकेत ‘दानवीर कर्ण’ साकारणारे ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर (Pankaj Dheer Death) यांचं आज सकाळी दीर्घ आजारानंतर निधन झालं. कॅन्सरशी दीर्घकाळ झुंज देत अखेर त्यांनी 68व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे
दूरदर्शन वरील कर्ण- Pankaj Dheer Death
1988 साली प्रसारित बी.आर. चोप्रा यांची ‘महाभारत’ मालिका भारतीय घराघरात पोहोचली होती. त्या मालिकेतील कर्णाची भूमिका पंकज धीर यांनी ज्या ताकदीने साकारली, ती आजही प्रेक्षकांच्या मनात कोरलेली आहे. त्यांचा दमदार आवाज, भावनांनी ओथंबलेलं अभिनय आणि करुणा-शौर्य यांचा संगम असलेली ती व्यक्तिरेखा अजरामर झाली आहे. एक रंजक किस्सा म्हणजे, मालिकेच्या सुरुवातीला पंकज धीर यांना अर्जुनची भूमिका देण्याचा विचार होता, मात्र त्यासाठी मिशा काढाव्या लागणार होत्या, हे त्यांनी नाकारलं. त्यानंतर त्यांना कर्णाची भूमिका देण्यात आली आणि तेव्हाच त्यांच्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली. पंकज धीर यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीपासून केली. रंगमंचावर कमावलेला अनुभव त्यांनी छोट्या पडद्यावर आणखी खुलवला. ‘चंद्रकांता’मधील शिवदत्त, ‘द ग्रेट मराठा’, ‘युग’, ‘बढ़ो बहू’ अशा विविध मालिकांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. Pankaj Dheer Death

सहकाऱ्यांचं आणि चाहत्यांचं श्रद्धांजलीपर शब्दांत दुःख
पंकज धीर यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर भावनिक श्रद्धांजलीचा वर्षाव पाहायला मिळत आहे. अनेक सहकलाकार, दिग्दर्शक, आणि चाहते “कर्ण अजरामर आहे”, “एक युग संपलं”, “खरा योद्धा गेला” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त करत आहेत. त्यांच्या संवादांच्या आठवणी, फोटो आणि व्हिडीओ क्लिप्स शेअर करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.
कला-जगतातील एक ‘धीर’ पुरुष कायम आठवणीत
पंकज धीर हे केवळ एक अभिनेते नव्हते, ते पौराणिक व्यक्तिरेखा सजीव करणारे एक कलाकार होते. त्यांचा अभिनय, त्यांची निष्ठा आणि प्रत्येक भूमिकेतली सखोलता हा आजच्या नवोदितांसाठी एक आदर्श राहील. कर्णाच्या रूपात त्यांनी आपली अशी छाप पाडली आहे, जी काळाच्या पुढे जाऊनही प्रेक्षक विसरू शकणार नाहीत. पंकज यांच्या आठवणी, भूमिका आणि अस्तित्व, भारतीय दूरदर्शनसृष्टीत सदैव अजरामर राहील.











