नवी दिल्ली – बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरची दोन्ही मुलं समायरा आणि कियान हे दोघंही वडील संजय कपूर यांच्या संपत्तीत हिस्सा मागण्यासाठी दिल्ली कोर्टात गेले आहेत. संजय कपूर यांच्या 30 हजार कोटींच्या संपत्तीत हिस्सा मिळावा अशी मागणी या दोघांकडून करण्यात आलीय.
संजय कपूर याची तिसरी पत्नी प्रिया सचदेव कपूर हिच्यावर करिश्माच्या मुलांनी आरोप केले आहेत. संजय कपूर याचं मृत्यूपत्र बदलून प्रियानं संपूर्ण संपत्ती ताब्यात घेतली असल्याचा दावा करण्यात आलाय.

काय आहे याचिकेत?
करिश्मा कपूरच्या माध्यमातून दोनही मुलांनी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली ाहे. यात जून 2025 मध्ये इंग्लंडमध्ये संजय कपूरच्या अचानक निधनाचा उल्लेख करण्यात आलाय. संजय कपूरच्या मृत्यूनंतर प्रिया कपूर हिनं चुकीच्या पद्धतीनं दोन्ही मुलांना संपत्तीपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही याचिकेत करण्यात आलाय.
याचिकेत प्रिया कपूरसह तिची मुलं, संजय कपूरची आई रानी कपूर आणि मृत्यूपत्राचं काम पाहणाऱ्या श्रद्धा सूरी मरवाह हिलाही आरोपी करण्यात आलंय. आता या प्रकरणात 10 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.
मृत्युपत्रावरुन मोठा वाद
या वादाचं मूळ 21 मार्च 2025 रोजी लिहिण्यात आलेलं मृत्यूपत्र आहे. यात संजय कपूर यानं त्याची सर्व मालमत्ता पत्नी प्रिया कपूर हिच्या नावे केल्याचा दावा करण्यात आलाय. प्रिया कपूर हिनं संजय कपूरच्या मृत्यूनंतर सात आठवडे मृत्यूपत्र लपवून ठेवल्याचा आरोप करिश्माच्या मुलांनी केलाय. दिनेश अग्रवाल आणि नितीन शर्मा यांनी या कामात प्रिया हिला मदत केल्याचा आरोपही करण्यात आलाय. संजय कपूरच्या मृत्यूनंतर दोन महिन्यांनी 30 जुलै 2025 ला मृत्यूपत्र कुटुंबासमोर आणण्यात आल्याचं याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे.
संजय कपूरची सर्व संपत्ती गोठवण्याची मागणी
करिश्माच्या मुलांनी कोर्टात आग्रह धरला आहे की, त्यांना कायदेशीर वारस म्हणून घोषित करण्यात यावं. यासोबतच पित्याच्या कमाईतील एक पंचमांश हिस्सा मिळावा अशी मागणीही करण्यात आली आहे. तूर्तास निर्णय लागेपर्यंत संजय कपूरची संपत्ती गोठवण्यात यावी, असंही याचिकेत नमूद करण्यात आलंय.











