MP Breaking News
Mon, Dec 15, 2025

पहिल्याच दिवशी कोल्हापूर सर्किट बेंचच्या बोर्डावर 300 केसेस, सरन्यायाधीश भूषण गवईंच्या हस्ते उद्घाटन

Written by:Smita Gangurde
कोल्हापूर सर्किट बेंच हे मुंबई उच्च न्यायालयाचं चौथं पीठ असणार आहे. सोमवारपासून एक खंडपीठ आणि दोन एकल पीठाच्या सहाय्यानं कोर्टाचा कारभार सुरु होणार आहे.
पहिल्याच दिवशी कोल्हापूर सर्किट बेंचच्या बोर्डावर 300 केसेस, सरन्यायाधीश भूषण गवईंच्या हस्ते उद्घाटन

कोल्हापूर – पश्चिम महाराष्ट्रासाठी सर्वात महत्त्वाचा असणारं मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच कोल्हापुरात सोमवारपासून कार्यरत होणार आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा पाच जिल्ह्यांना या सर्किट बेंचचा फायदा मिळणार आहे.

कोल्हापुरात सर्किट बेंचचं उद्धाटन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते रविवारी पार पडलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ुपस्थइती होती. मुंबई उच्च न्यायालयावरील ताण या सर्किट बेंचमुळे कमी होणार असून, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील पाच जिल्ह्यातील अनेक खटले आता कोल्हापुरात चालवले जातील.

पहिल्याच दिवशी प्रचंड खटल्यांची संख्या

कोल्हापूरच्या सर्किट बेंचचं उद्घाटन होणार, त्याच दिवशी कोर्टाच्या बोर्डावर 300 खटल्यांची सुनावणी जाहीर करण्यात आलीय. यात न्या. एम. एस. कर्णिक आणि न्या. शर्मिला देशमुख यांच्या डिव्हिजन बोर्डाकडे 79 केसेस, न्या. शिवकुमार दिघे यांच्या बेंचकडं 74 केसेस, न्या. एस. जी. चपळगावकर यांच्या बेंचकडं 147 केसेस असतील.

42 वर्षांच्या संघर्षानंतर सर्किट कोर्ट

1933 पासून सर्किट बेंचसाठीचा लढा सुरु होता. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या माध्यमातून 6 जिल्ह्यांतील वकील आणि पक्षकारांनी या कोर्टासाठी लढा दिला.

कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील दीड लाखआंहून अधिक प्रकरणं ही मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. यासाठी वकील आणि पक्षकारांना दर आठवड्याला मुंबईच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. आता कोल्हापुरात सर्किट बेंच सुरु झाल्यानं या सगळ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबईला दर आठवड्याला माराव्या लागणाऱ्या फेऱ्यांमुळे आर्थिक आणि वेळेचं नुकसान होत होतं. आता पैसे, श्रम आणि वेळेची बचत होणार आहे. चार दशकांच्या संघर्षानंतर मिळालेल्या सर्किट बेंचमुळे कोल्हापुरात आनंदोत्सव साजरा करण्यात येतोय.

काय आहे इतिहास?

मुंबई प्रांत आणि कोल्हापूर राज्यात 1866 साली एका करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या, त्यानंतर 1867 साली कोल्हापुरात न्यायालयाची सुरुवात झाली. महादेव गोविंद रानडे हे कोल्हापूर न्यायालयाचे पहिले न्यायाधीश होते. छत्रपती राजाराम महाराज यांच्या कार्यकाळात कोल्हापूर राज्य उच्च न्यायालय 1929 साली सुरु करण्यात आलं. तर कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनची स्थापना 1933 साली करण्यात आली.

कोल्हापूर सर्किट बेंच हे मुंबई उच्च न्यायालयाचं चौथं पीठ असणार आहे. सोमवारपासून एक खंडपीठ आणि दोन एकल पीठाच्या सहाय्यानं कोर्टाचा कारभार सुरु होणार आहे. मुंबई हायकोर्टानं यासाठी चार न्यायाधीशांची नियुक्ती केली आहे. तर 250 कर्मचारी या ठिकाणी तैनात असणार आहेत.