अजित पवारांच्या अडचणी वाढल्या, IPS अधिकारीची कारवाई योग्यच; मुख्यमंत्रीही नाराज?

आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर काय कारवाई होणार, हे पाहावं लागणार आहे

मुंबई- सोलापूरच्या महिला IPS अधिकाऱ्याला केलेल्या दमदाटीप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार वादात सापडलेत. अवैध मुरुम उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या अंजना कृष्णा यांना कर्तव्यापासून रोखलं असा आरोप अजितदादांवर होतोय.त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी IPS अंजना कृष्णा यांच्याकडेच बोट दाखवण्याचा प्रयत्न केला

महिला IPS अधिकाऱ्याला केलेल्या दमदाटीप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्टीकरण देत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र दमदाटीच्या व्हिडीओमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादांवर नाराज असल्याचं समजतंय .

केलेली कारवाई नियमाप्रमाणेच

मुरूम उपसासंदर्भात कुर्डू गावात प्रशासनाने केलेली कारवाई नियमानुसारच केल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलीय. कुर्डू गावात झालेला मुरूम उपसा प्रकरणात कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नव्हती. ज्या दोन रस्त्यासाठी मुरूम उपसा सुरु असल्याचा दावा केला जातोय, त्या रस्त्यासाठी दिलेली वर्कऑर्डरची मुदत आधीच संपलेली आहे. एका रस्त्यासाठीची वर्कऑर्डर ऑक्टोबर 2024 मध्ये संपली. तर दुसऱ्या रस्त्याची वर्कऑर्डर मुदत ही एप्रिल 2025 मध्ये संपली तहसीलदार यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत ही माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचे सविस्तर अहवाल सादर करण्याचे तहसीलदारांना सूचना देण्यात आल्यात.

मुख्यमंत्री अंजना कृष्णा यांच्या पाठिशी

IPS अंजना कृष्णा यांच्या पाठीशी मुख्यमंत्री ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतलीय. अजित पवारांच्या व्हिडीओनंतर माढा तालुक्यातील कुर्डू गावातील अवैध मुरुम उत्खनन प्रकरण चांगलचं तापलंय. खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनीही गंभीर आरोप केलेत. यापूर्वी महसूल अधिकाऱ्यांवरही हल्ला झाला होता म्हणून IPS अंजना कृष्णा तिथे पोहोचल्याचं मोहिते पाटलांनी म्हटलंय

अजित पवारांचे पदाधिकारीही अडचणीत

आयपीएस अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात संभाषण घडवून आणणारा राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष बाबाराजे जगताप प्रसिद्धीच्या झोतात आलाय. त्यानंतर या बाबा जगतापचा गांजा पितानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. दरम्यान, ज्याने व्हायरल केला त्याचा कार्यक्रम करण्याची धमकी राष्ट्रवादीचा पदाधिकारी नितीन जगताप यानं दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे अधूनमधून आपल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना धडे देत असतात. आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर काय कारवाई होणार, हे पाहावं लागणार आहे


About Author

Smita Gangurde

Other Latest News