गेल्या काही दिवसांत अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यात पावसाने कहर केल्याचं अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं. त्यानंतर परिस्थितीत काहीशी सुधारण होत असतानाच पावसाने पुन्हा एकदा अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्याच्या काही भागात थैमान घातले. त्यानंतर जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. बीड आणि अहिल्यानगरमधील काही भागात पुन्हा पुरस्थिती पाहायला मिळत आहेत.
बीड जिल्ह्यात मुसळधार पावसाचे थैमान
हवामान विभागाने विविध जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे. यातच आता पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. बीडमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून पावसामुळे रस्ते, ओढे, नाल्यांना नदीचं स्वरुप आले आहे. अनेक वाड्या आणि डोंगरातील वस्त्यांवरील लाईट गायब आहे. नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अहिल्यानगर जिल्ह्याला पावसाचा तडाखा
अहिल्यानगरमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे सीना नदीला पूर आला असून पावसामुळे रस्ते, ओढे, नाल्यांना नदीचं स्वरुप आले आहे. पुराच्या पाण्यामुळे नगर कल्याण महामार्ग, तसेच बोलेगाव आणि वारुळाचा मारुती कडे जाणारा रस्ता वाहतुकीस बंद आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या फळबागा आणि पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल असून सरकारने तात्काळ पंचनामे करवे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण कायम असलेले पाहायला मिळत असून काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान विभागाने विविध जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा देखील त्यादृष्टीने सतर्क आहे.











