आज राज्यातील खालील जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये धुमाकूळ घालणारा पाऊस ऑक्टोबर संपायला आला, तरी अजून पाठ सोडायला तयार नाही. ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर कोसळणाऱ्या पावसामुळे नागरिकांच्या आनंदावर विरजण पडत आहे. अशा परिस्थितीत आज पुन्हा हवामान विभागाकडून काही जिल्ह्यांसाठी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना या काळात सतर्कता बाळगावी लागणार आहे.
आज अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता
महाराष्ट्राच्या अनेक भागांसाठी भारतीय हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. त्या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह वादळ आणि हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याचा इशारा दिला आहे. यामध्ये कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्याचा समावेश आहे. भारतीय हवामान विभागानुसार, बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण झालं आहे. त्यामुळे वारे वाहत असून राज्यातील हवामानात असे बदल दिसत आहेत. ऐन दिवाळीत पाऊस कोसळत आहे.

21 ऑक्टोंबरला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी मुंबईत पाऊस कोसळला. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांची पावसामुळे चांगलीच तारांबळ उडाली. त्यानंतर काल 22 ऑक्टोबर रोजी पुन्हा संपूर्ण महाराष्ट्रात विजेच्या गडगडाटासह पाऊस पडला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळच्यावेळी नवीन कपडे घालून बाहेर पडण्याच्या, फटाके फोडण्याच्यावेळीच हा पाऊस बरसला. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. आज देखील हवामान विभागाने नागरिकांना खबरदारी म्हणून योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, गुरुवार ते शनिवार या तीन दिवसांत मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता असून, या काळात मेघगर्जना देखील होऊ शकते. दक्षिण कोकणातील रत्नागिरी येथे शनिवारपर्यंत, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत यलो अलर्ट कायम राहील.
रब्बी हंगामावर संकट, शेतकरी चिंतेत
सततच्या पावसाळी आणि ढगाळ वातावरणामुळे राज्यातील रब्बीचा हंगाम देखील मागास होण्याची चिन्हे सध्या दिसत आहेत. दरम्यान नैऋत्य मान्सून राज्यातून पूर्णपणे माघारी फिरला आहे. तयार झालेल्या पोषक हवामानामुळे राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये हलक्यातील मध्यम सरींची शक्यता हवामाना विभाग आणि आगामी काळामध्ये वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेती कामाचे नियोजन करावे असं आवाहन देखील करण्यात आला आहे. शेतकरी सध्या चिंतेत आहेत.











