मोठी अपडेट; महाराष्ट्रात 12 ऑक्टोबरपर्यंत पावसाची शक्यता कायम; हवामान विभागाचा अंदाज

Rohit Shinde

महाराष्ट्रातील पावसाबाबत हवामान विभागाची मोठी अपडेट समोर आली आहे. आज, म्हणजेच शुक्रवारपासून चक्रीवादळ ओडिशा किनाऱ्याहून पुढे छत्तीसगड, झारखंड आणि बिहारसह भारताच्या अंतर्गत भागात पोहोचणार असून त्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या खोल दाबाच्या क्षेत्रामुळे गुजरात आणि महाराष्ट्रातही जोरदार पाऊस होऊ शकतो. याशिवाय राजस्थान आणि उत्तर प्रदेशातही चक्रीवादळाचा परिणाम जाणवेल, ज्यामुळे राजस्थानपासून हरियाणा आणि दिल्लीपर्यंत हलक्या सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या काळात राज्याच्या काही भागात तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

12 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा अंदाज

विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांतून मान्सून परतीचा पाऊस सुरू झाला असून 10 ते 12 ऑक्टोबरपर्यंत तो कायम राहण्याची शक्यता आहे. हा पाऊस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा असेल. आज कोकणपट्टा वगळता महाराष्ट्रातील बहुतेक भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

उत्तर-पश्चिम बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण, 3-4 ऑक्टोबरला तीव्रता वाढण्याची शक्यता. 5 ते 7 ऑक्टोबरदरम्यान पश्चिमी विक्षोभ जास्त सक्रिय होणार, त्यामुळे हवामानात मोठे बदल दिसतील. 12ऑक्टोबरपर्यंत पावसाची शक्यता कायम, महाराष्ट्रात ऊन-पावसाचा खेळ सुरू राहणार, मात्र पावसामुळेही हवेत गारवा जाणवणार नाही.

गुजरातच्या किनाऱ्याजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढते आहे. पुढील 24 तासांत हवामानात मोठे बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अरबी समुद्रात तयार झालेला हा पट्टा महाराष्ट्राच्या दिशेनं सरकेल का याकडे हवामान खात्याचं लक्ष आहे. तसं झाल्यास अवकाळी पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते.

महाराष्ट्रातील पाऊस कधी थांबणार?

महाराष्ट्रातील पाऊस पूर्णपणे कधी थांबणार? असा सवाल शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात आहे. याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, 5 ऑक्टोबरपर्यंत मान्सूनचा परतीचा पाऊस संपण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यानंतर वादळामुळे अवकाळी पावसाचं संकट राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. ऑक्टोबर हिटचा फटका विशेषतः रात्री जाणवू शकतो. महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटदरम्यान अति उष्ण तापमान नसेल, पण दमट हवामानामुळे उकाडा वाढेल आणि घामाच्या धारांनी लोक हैराण होतील. तरी देखील 12 ऑक्टोबरपर्यंत कमी अधिक प्रमाणात पावसाची शक्यता कायम आहे.

ताज्या बातम्या