महाराष्ट्रातील शासकीय सोयाबीन खरेदी संदर्भात मोठी अपडेट; ‘या’ तारखेपासून खरेदी होणार सुरू !

सोयाबीनच्या प्रत्यक्ष खरेदीला १५ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असल्याची माहिती पणनमंत्री जयकुमार रावल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यंदाच्या महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः सोयाबीन पिकावर या नैसर्गिक आपत्तीचा मोठा परिणाम झाला आहे. सततच्या पावसामुळे पिके पाण्याखाली गेली, मुळे कुजली आणि उत्पादन क्षमता घटली. शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने घेतलेले सोयाबीन पीक आता नष्ट झाल्याने त्यांच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम झाला आहे. बाजारात सोयाबीनच्या दरातही घट झाल्याने नुकसान भरून काढणे अशक्य बनले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देणारी अशी एक मोठी बातमी समोर येत आहे.

शासकीय सोयाबीन खरेदी संदर्भात मोठी अपडेट

यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद आणि मूग खरेदीसाठी राज्यभरात तयारी पूर्ण झाली असून शेतकऱ्यांची नोंदणी गुरुवार ३० ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. प्रत्यक्ष खरेदीला १५ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असल्याची माहिती पणनमंत्री जयकुमार रावल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
त्यांनी सांगितले की, “बारदान्याच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून आम्ही आधीच आवश्यक पावले उचलली आहेत. पणन महामंडळाने बारदाना खरेदीची प्रक्रिया सुरू केली असून यंदा तुटवडा भासणार नाही.”

सोयाबीन उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार !

केंद्र सरकारने १८ लाख ५० हजार टन सोयाबीन, ३ लाख ३० हजार टन मूग, आणि ३२ लाख ५६ हजार क्विंटल उडीद खरेदीसाठी मान्यता दिली आहे. रावल म्हणाले, “मागील वर्षी ११ लाख २१ हजार टन सोयाबीन खरेदी झाली होती. यंदा उत्पादन सुमारे ७५ लाख टनांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. केंद्राकडे २० लाख टन खरेदीचा प्रस्ताव दिला होता, त्यापैकी पहिल्या टप्प्यात १८.५ लाख टन खरेदीस मान्यता मिळाली आहे. आवश्यकता भासल्यास उर्वरित खरेदीलाही मंजुरी मिळेल.

रावल पुढे म्हणाले की, “मध्य प्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्रात सोयाबीनखालील क्षेत्र मोठे आहे आणि येथे उत्पादित होणाऱ्या सोयाबीनला जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात भावांतर योजनेची आवश्यकता नाही. उलट, येथे उच्चांकी खरेदी होईल.” मागील वर्षी राज्यात ५६५ खरेदी केंद्रे कार्यरत होती. यंदा ही संख्या दुप्पट करण्यात येणार आहे. सर्व खरेदी प्रक्रिया ऑनलाइन आणि पारदर्शक पद्धतीने राबविली जाईल. महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, विदर्भ सहकारी पणन महासंघ आणि राज्य कृषी पणन मंडळ यांच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक संस्था थेट सहभागी होऊ शकतील.

त्यामुळे एकूणच शासनाच्या सोयाबीन खरेदीचा मोठा फायदा आगामी काळात शेतकऱ्यांना होणार आहे, शेतकऱ्यांमधून देखील शासनाच्या या निर्णयाचे स्वागत होताना दिसत आहे. लवकरच खरेदी सुरू होणे अपेक्षित आहे. त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांकडून नाडल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

About Author

Rohit Shinde

Other Latest News