पश्चिम महाराष्ट्रात बनावट नोटांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. एक कोटीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात पाच आरोपींना अटकही झाली आहे. महात्मा गांधी पोलीस चौक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आर्थिक गुन्हे शाखा आणि पोलिसांकडून या प्रकरणात अधिकचा तपास सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
सांगलीत 1 कोटींच्या बनावट नोटा जप्त
सांगलीमधील मिरजजवळील निलजी-बामणी रोडवरील पुलाजवळ मोठी कारवाई करण्यात आली आहे. 500 रुपयांच्या बनावट नोटा बाजारात खपविण्याच्या उद्देशाने आलेल्या एका तरुणाला पोलिसांनी पकडलं. त्याच्याकडून तब्बल 1 कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. 500 रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी ताब्यात घेतल्या. बुधवारी दुपारी दोन वाजता महात्मा गांधी चौक पोलिसांचे पथक गस्तीवर असताना ही कारवाई करण्यात आली. संशयित देसाई हा बनावट नोटा बाजारात खपविण्याच्या तयारीत असल्याचे समोर आलं. याप्रकरणी पोलिस कर्मचारी राजेंद्र हारगे यांनी गांधी चौक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, संशयितावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

नागरिकांना पोलिसांचे सावधानतेचे आवाहन
पश्चिम महाराष्ट्रातील एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट चलनी नोटांवर ही पहिलीच कारवाई आहे. झेरॉक्स मशीन, बनावट नोटा मोजण्याचं मशीन, स्कॅनर आणि प्रिंटर जप्त करण्यात आलं आहे. आरोपीकडून 500 आणि 200 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली. अशा प्रकरणात नोटा हाताळताना नागरिकांना योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.











