कोकण हे आपल्या निसर्गरम्य सौंदर्यासाठी, हिरव्यागार डोंगररांगा, स्वच्छ समुद्रकिनारे आणि शांत वातावरणासाठी ओळखले जाते. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीने आधीच कोकणातील निसर्गाचे दर्शन आपल्या चित्रपटांतून घडवले आहे. आता साऊथ सिनेसृष्टीलाही या परिसराची भुरळ पडली आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य, पारंपरिक संस्कृती आणि स्थानिक रंगत यामुळे कोकण चित्रिकरणासाठी आदर्श ठिकाण ठरत आहे. दक्षिणेतील नावाजलेला कलाकार विजय देवरकोंडाच्या आगामी चित्रपटाचे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात शुटींग सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे.
साऊथ सिनेसृष्टीला कोकणाची भुरळ
कोकणच्या हिरव्यागार डोंगरदऱ्या, नारळाच्या बागा आणि शांत समुद्रकिनाऱ्यांने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. आता साऊथ सिनेसृष्टीचं लक्षही कोकणाकडे वळलं आहे. अभिनेता विजय देवरकोंडाचं मुक्कामपोस्ट सध्या कोकणात आहे. रत्नागिरीत तो त्याच्या आगामी सिनेमाचं शूटींग करतोय. विजय देवरकोंडा ‘रावडी जनार्दन’ या त्याच्या आगामी सिनेमात दिसणार आहे. अभिनेत्री कीर्ती सुरेश त्याच्याबरोबर प्रमुख भूमिकेत आहे. या सिनेमाचं शूटींग सध्या रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे या निसर्गरम्य गावात सुरू आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सैतवडे गावातील गुंबद ग्रामपंचायत हद्दीत ‘रावडी जनार्दन’ सिनेमाचं शूटिंग सुरू आहे. गावातील द मॉडेल इंग्लीश स्कुलच्या पटांगणावर जिल्हाधिकारी कार्यालयाचा भव्य सेट उभारण्यात आला आहे. सिनेमाचं कथानक 1900 सालातील असल्याने त्या काळचा ब्रिटिशकालीन सेट गावात उभारण्यात आला आहे. हे शूट आणखी काही दिवस आजूबाजूच्या गावांत चालू राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.
‘रावडी जनार्दन’ सिनेमाचं शूटींग सैतवडे गावातील समुद्रकिनाऱ्यावरही सुरू आहे. सिनेमातील काही महत्त्वाचे सीन्स या ठिकाणी शूट करण्यात आलेत. सैतवडेतील शूटिंग पूर्ण झाल्यानंतर पुढील शेड्युल शेजारच्या बरवडे गावात होणार असल्याचं सांगितलं जातंय.
कोकणचं निसर्ग सौंदर्य जगात भारी
कोकणचं निसर्गसौंदर्य जगात खरंच “भारी” आहे. समुद्राच्या निळ्या लाटा, सोन्यासारखी वाळू, हिरवेगार डोंगर, धबधबे, आणि शांत वातावरण हे सगळं एकत्र मिळून कोकणाला स्वर्गीय बनवतात. येथील नारळाची झाडं, आंब्याची बागं, पारंपरिक गावे आणि साधेपणातला देखणा सौंदर्याचा अनुभव जगात कुठेच मिळत नाही. कोकण म्हणजे निसर्ग, संस्कृती आणि सौंदर्य यांचा अप्रतिम संगम त्यामुळेच म्हणतात, “कोकणचं सौंदर्य पाहिलं की जग फिकं वाटतं!”
विजयच्या रावडी जनार्धन चित्रपटाबाबत…
विजय देवरकोंडाचा आगामी चित्रपट “राऊडी जानार्धन” हा प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण करणारा अॅक्शन ड्रामा ठरत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रवी किरण कोला करत आहेत, तर निर्मिती दिल राजू यांच्या श्री वेंकटेश्वरा क्रिएशन्स या बॅनरखाली होत आहे. चित्रपटाची पार्श्वभूमी रायालसीमा परिसरातील राजकीय आणि ग्रामीण संघर्षावर आधारित असून त्यात प्रचंड अॅक्शन आणि भावनिक कथा एकत्र पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री कीर्ती सुरेश हिची मुख्य भूमिकेत निवड झाली आहे. चित्रपटाचे शूटिंग ऑक्टोबर २०२५ मध्ये मुंबईत सुरू होणार असून प्रदर्शित होण्याची शक्यता २०२६ च्या मध्यावर आहे. या चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.











