Crime News: बुलढाणा हादरलं! पती-पत्नीच्या वाद, बापाने जुळ्या मुलींचा गळा चिरला!

Rohit Shinde

महाराष्ट्रातील बुलढाणा येथून एक अत्यंत वेदनादायक आणि अस्वस्थ करणारी घटना उघडकीस आली आहे. पत्नीशी झालेल्या भांडणामुळे संतापलेल्या एका व्यक्तीने आपल्या दोन जुळ्या मुलींचा गळा चिरला. निष्पाप मुलांची हत्या केल्यानंतर, आरोपी वडिलांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि आपला गुन्हा कबूल केला. सध्या आरोपी बाप पोलिसांच्या अटकेत असल्याची माहिती समोर येत आहे.

नेमकी काय घटना घडली ?

राहुल चव्हाण आपल्या पत्नी आणि दोन मुलींना घेऊन घरच्या दिशेने जात होता. प्रवासादरम्यान नवरा-बायको यांच्यात वाद सुरु झाला. या वादात रागाच्या भरात पत्नीने माहेरी जाण्याचा निर्णय घेतला, तर राहुल आपल्या मुलींसह पुढे निघाला. रागाच्या भरात खामगाव – जालना मार्गावरील अंढेरा फाटा जवळील जंगलात त्याने आपल्या दोन जुळ्या मुलींची गळा कापून निर्दयपणे हत्या केली. या घटनानंतर राहुलने स्वतः वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन हत्येची कबूली दिली.

पोलिसांनी तत्काळ अंढेरा पोलिसांना संपर्क करून प्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटना स्थळ गाठून मृत चिमुकल्यांचे मृतदेह हस्तगत केले आहेत. संपूर्ण परिसरात या घटनेने खळबळ उडाली आहे. सध्या आरोपी राहुल अंढेरा पोलीसांच्या ताब्यात असून पोलीस पुढील चौकशी करत आहेत.

आरोपीने गुन्हा कबूल केला !

पोलिस चौकशीत राहुलने सांगितले की, त्याच्या पत्नीपासून वेगळे झाल्यानंतर तो दोन्ही मुलींना बुलढाण्यातील अंधेरा फाट्याजवळील जंगलात घेऊन गेला. तो इतका संतापला की त्याने दोन्ही मुलींचे गळे क्रूरपणे कापले. हत्येनंतर, जेव्हा त्याला त्याचे कृत्य लक्षात आले तेव्हा त्याने पोलिसांशी संपर्क साधला आणि आपला गुन्हा कबूल केला. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडून माहिती मिळाल्यानंतर जेव्हा पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना दोन्ही मुलींचे मृतदेह आढळले. सध्या, पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. या प्रकरणात पत्नीची चौकशी होण्याची शक्यता देखील आहे.

ताज्या बातम्या