ठाकरेंच्या बंधूंच्या युतीची नाशिकमध्ये पायाभरणी, दोन्ही पक्षांच्या नेत्यांचा एकत्रित मोर्चा, पुढची दिशा स्पष्ट?

आता दोन्ही पक्षाचा पुढचा मोर्चा पुण्यात काढण्यात येणार आहे. त्यामुळं राज्याच्या राजकारणात नवं समीकरणं जुळलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही

नाशिक- प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीतून नव्या युतीची पायभरणी झालीय.नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं प्रथमच एकत्र येत ताकद दाखवून दिली. संजय राऊत, बाळा नांदगावकर खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरले होते. वाढती गुन्हेगारी, अमली पदार्थांची विक्री, महानगरपालिकेतील कारभार या प्रश्नांवरून महायुती सरकारच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी एकजुटीचा संदेश देत आगामी महापालिका निवडणुकीत एकत्रित लढण्याचे संकेतही दिलेत

एकत्रित लढा देण्याची गरज आहे असं मत यावेळी उपस्थित नेत्यांनी व्यक्त केलं. मनसे आणि शिवसेना एकत्र नाही तर जनता सुद्धा एकत्र आहे हम सब एक है, असा संदेश या मोर्चातून गेल्याचं सांगण्यात आलंय. या मोर्चाची नोंद राज्य सरकारला घ्यावीच लागेल, आता एकजुटीला दृष्ट लागू देऊ नका, असं आवाहनही यावेळी करण्यात आलंय.

नाशिकमध्ये पहिल्यांदा मनसे आणि ठाकरे शिवसेना एकत्र

मुंबई पाठोपाठ नाशिक शहर ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठी उभं राहिलंय. मनसे स्थापनेनंतर नाशिककरांनी राज ठाकरेंनी भरभरुन साथ दिली आहे. त्यामुळं दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी सरकारविरोधील मोर्चासाठी नाशिकची निवड करत कार्यकर्त्यांना युतीबाबत योग्य तो संदेश दिलाय. हा मोर्चा आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातोय नाशिकची जनता, शेतकरी आणि महिला या मोर्चात सहभागी झाले होते. सरकारच्चया विरोधातला जन आक्रोशच्या यानिमित्ताने समोर आला असून, विरोधकांची जबाबदारी वाढली असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्यात.

ठाकरे बंधू एकत्र येणार का?

एकेकाळी एकमेकांचा चेहरा बघण्यासही तयार नसलेल्या ठाकरे बंधूंच्या गाठीभेठी वाढल्यात. धोक्यात आलेलं अस्तित्व टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंना मुंबई महापालिकेवर झेंडा फडकवयाचा आहे, तर राजकीय अस्तित्वाची लढाई लढत असलेले राज यांनाही दुसरा पर्याय नाहीय. पण या दोघा बंधूंच्या संभाव्य युतीत महाविकास आघाडीचा अडसर आहे

ठाकरेंसमोर काय पर्याय?

१. राज ठाकरे मविआत सहभागी होण्याची शक्यता कमी
२. उद्धव ठाकरेंना मविआतून बाहेर पडावं लागेल
३. ठाकरे बंधू सर्व निवडणुका एकत्र लढवू शकतात.
४. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकाउद्धव ठाकरे मविआतून लढवतील
५. महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येण्याचा पर्याय

आता पुढचा मोर्चा पुण्यात

ठाकरे बंधूंना मुंबईतील मराठी मेळाव्यातून एकप्रकारे नव्या युतीचा श्रीगणेशा केला. मग ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं नाशिकमधून पहिला मोर्चा काढत पुढची दिशा स्पष्ट केलीय. आता दोन्ही पक्षाचा पुढचा मोर्चा पुण्यात काढण्यात येणार आहे. त्यामुळं राज्याच्या राजकारणात नवं समीकरणं जुळलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही


About Author

Smita Gangurde

Other Latest News