MHADA Lottery: पुण्यात अवघ्या 7 लाखांत फ्लॅट घेण्याची संधी; म्हाडा लॉटरीसाठी अर्ज कसा आणि कधीपर्यंत करायचा?

खरंतर म्हाडाच्या माध्यमातून महानगरांत स्वस्तात मस्त घर मिळावे, असे अनेकांचे स्वप्न असते. आता पुण्यात असेच घर कमी किंमतीत मिळविण्याची संधी म्हाडामुळे निर्माण झाली आहे.

म्हाडाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना स्वस्त दरात घरे उपलब्ध करून दिली जातात. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा, हे संस्थान शहरातील तसेच ग्रामीण भागातील लोकांसाठी घरकुल योजना राबवते. घरांच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांना स्वतःचे घर घेणे कठीण झाले आहे. अशा वेळी म्हाडाच्या योजना मोठा आधार ठरतात. पुण्यात देखील अगदी अशीच एक संधी निर्माण झाली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळाकडून पुणे आणि आसपासच्या परिसरातील घरांच्या विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या लॉटरीत तुम्हाला स्वस्तात मस्त असं घर मिळणार आहे.

पुण्यात स्वस्तात घर घेण्याची सुवर्ण संधी!

पुण्यात तुम्हाला आपल्या हक्काचं घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. कारण, म्हाडाच्या पुणे मंडळाकडून बांधण्यात आलेल्या घरांच्या विक्रीसाठी जाहिरात काढण्यात आली आहे. या लॉटरीत एकूण 4186 घरांचा समावेश आहे. तर 1982 घरी ही प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या नुसार विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. एकूण 6168 घरांच्या विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. खास बाब म्हणजे या लॉटरीतील सर्वात स्वस्त घराची किंमत 7 लाखांपेक्षाही कमी आहे.

अर्ज प्रक्रिया आणि अंतिम तारीख काय?

तर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेतील सर्वात स्वस्त घराची किंमत 7 लाखांपेक्षा कमी आहे. या योजनेचा संकेत क्रमांक 867-बी असून योजनेचे नाव चाकण – ता. खेड, जि. पुणे सर्व्हे नं. 818 (PMAY) – 1 आरके 1 असे आहे. या सदनिकेची अंदाजे किंमत 695,000 रुपये आहे. सदनिकेचे बांधकाम क्षेत्रफळ (चौ. मी.) 27.74 इतके आहे. सदनिकेचे चटई क्षेत्रफळ (चौ. मी.) 23.74 आहे. एकूण सदनिका 3 आहेत.
या लॉटरीची सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. जाहिरातीची पीडीएफ कॉपी पाहण्यासाठी Pune MHADA Lottery 2025 notification pdf या लिंकवर क्लिक करा.
  • सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची सुरुवात – 11 सप्टेंबर 2025 (दुपारी 12.30 वाजल्यापासून)
  • ऑनलाईन रक्कम स्विकृती सुरुवात – 11 सप्टेंबर 2025 (दुपारी 12.30 वाजल्यापासून)
  • सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – 31 ऑक्टोबर 2025 (रात्री 11.59 वाजेपर्यंत)
  • ऑनलाईन रक्कम स्विकृती अंतिम तारीख – 31 ऑक्टोबर 2025 (रात्री 11.59 वाजेपर्यंत)
  • बँकेत RTGS/NEFT द्वारे अनामत रक्कम भरण्याची तारीख – 1 नोव्हेंबर 2025 (संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत)
  • सोडतीसाठी स्विकृत अर्जाच्या प्रारुप यादीची प्रसिद्धी – 11 नोव्हेंबर 2025 (सायंकाळी 6 वाजेपर्यंत)
  • दावे, हरकती दाखल करण्याची तारीख – 13 नोव्हेंबर 2025 (दुपारी 12 वाजेपर्यंत)
  • सोडतीसाठी स्विकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी – 17 नोव्हेंबर 2025 (सायंकाळी 6 वाजेपर्यंत)
  • सोडत दिनांक – 21 नोव्हेंबर 2025 (दुपारी 12 वाजता)
  • यशस्वी अर्जदारांची नावे वेबसाईटवर प्रसिद्ध करणे – 21 नोव्हेंबर 2025 (सायंकाळी 6 वाजेपर्यंत)

त्यामुळे तुम्ही देखील या संधीचा फायदा घेऊ शकता. लॉटरी प्रणालीद्वारे पात्र अर्जदारांना घरे दिली जातात. यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल, निम्न व मध्यमवर्गीयांसाठी विशेष कोटा असतो. म्हाडा घरे ही केवळ स्वस्त नसून कायदेशीरदृष्ट्याही सुरक्षित असतात. त्यामुळे अनेकांना स्वतःचे घर या योजनांमुळे मिळते आणि गृहस्वप्न साकार होते. त्यामुळे तुम्ही देखील पुण्यात निर्माण झालेली ही नामी संधी साधू शकता.


About Author

Rohit Shinde

Other Latest News