मुंबई- आशिया कपमध्ये रविवारी दुबईत भारत आणि पाकिस्तानात मॅच होतेय. पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर दोन्ही देशांत क्रिकेट मॅच होण्याची ही पहिलीच संधी आहे.
आशिया कप मालिकेचं यजमानपद बीसीसीआयकडे आहे. मात्र बीसीसीआयचेही अनेक अधिकारी मॅच पाहण्यासाठी जाणार नाहीत. मात्र बोर्डाचे कार्यकारी अध्यक्ष राजीव शुक्ला मॅच पाहण्यासाठी जाऊ शकतात. कारण ते एशियन क्रिकेट काऊन्सिलचेही मेंबर आहेत.

पहलगाम शहीद पत्नीचं काय आवाहन
पहलगाम हल्ल्यात जीव गमावलेल्या शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐशन्या यांनी मॅचवर बहिष्कार घालण्याचं आवाहन जनतेला केलं आहे. त्यांनी म्हटलंय की माझ्या डोळ्यासमोर माझ्या पतीला गोळ्या मारण्यात आल्या. पहलगाम हल्ल्यात 26 लोक मारले गेले. ऑपरेशन सिंदूरमध्येही अनेक जवान मारले गेले आहेत. असं सगळं असतानाही मॅच खेळली जातेय.
केजरीवाल यांचाही इशारा
दुसरीकडे आपचे नेते दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही कल्ब, पब आणि रेस्टॉरंट्समध्ये मॅच दाखवू नये असं आवाहन केलं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीही जर रक्त आणि पाणी एकत्र वााहणार नसेल तर मॅच कशी खेळले जातेय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
पंतप्रधान मोदींना मॅचचं प्रसार रोखण्याचं आवाहन
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पहलगाम मध्ये जे घडलं त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, असं म्हटलय. तर वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज संघटनेनं पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून भारत पाकिस्तान एशिया मॅचचं लाईव्ह प्रसारण रोखण्याचं आवाहन केलंय.
क्रिकेट खेळणं देशभक्तीची खिल्ली – ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली आहे. भारतीय सैन्य सीमेवर जीवनाचं बलिदान करतायेत. पाकिस्तान दबशतवादाला खतपाणी घालतंय. अशा स्थितीत क्रिकेट मॅच खेळणं देशभक्तीची खिल्ली उडवण्यासारखं आहे. असं ते म्हणालेत. मोदी सरकारनं देशभक्तीला व्यापार करुन ठेवलं असल्याची जहरी टीकाही त्यांनी केलीय.
उद्या 14 सप्टेंबरला महाराष्ट्रात ठाकरे शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या आंदोलन करणार आहेत. महिला कार्यकर्त्या सिंदूर रक्षा अभियान किंवा माझं कुंकू, माझा देश घोषणेनं रस्त्यांवर उतरणार आहेत. घराघरातून सिंदूर एकत्र करुन ते सिंदूर मोदींकडे पाठवले जाणार आहेत.











