मुंबईकरांची लाईफलाईन असले्लया लोकल ट्रेनने दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाला या लोकल रेल्वेमुळे गती मिळते. दिवसेंदिवस प्रवाशांची वाढणारी संख्या आणि या प्रवाशांसाठी सेवा पुरवणारी लोकलची संख्या यांच्यात ताळमेळ बसत नाहीये. लोकल सेवेवर ताण निर्माण होत आहे. तसेच प्रवाशांना देखील अनंत अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळेच लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी सातत्याने होत आहे. त्या आता केंद्र सरकारने मुंबई लोकल सेवेच्या कायापालटासाठी निधीला मान्यता दिली आहे.
केंद्राकडून 16 हजार 200 कोटींचा निधी मंजूर
लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. कारण, मुंबईतील विविध रेल्वे प्रकल्पांच्या कामांना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. एकूण 12 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी तब्बल 16200 कोटी रुपायंच्या 12 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भाती माहिती लोकसभेत दिली आहे. या निधीमुळे रखडलेले प्रकल्प मार्गी लागणार आहेत. परिणामी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एक मोठा दिलासा मिळणार आहे. यासोबतच मुंबईकरांना लवकरच एसी लोकल मिळणार असून गारेगार प्रवास करता येणार आहे. नवीन एसी लोकल सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी 238 नवीन एसी लोकलचे रेक सुरू करण्यात येणार आहेत.
मंजूरी मिळालेले 12 प्रकल्प नेमके कोणते?
- मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाअंतर्गत (एमयूटीपी-II) सीएसएमटी-कुर्ला पाचवी आणि सहावी मार्गिकेसाठी (17.5 किमी) 891 कोटी रुपये खर्च अपेक्षित
- मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाअंतर्गत (एमयूटीपी-II) मुंबई सेंट्रल-बोरिवली सहाव्या मार्गिकेसाठी (30 किमी) 919 कोटी रुपये खर्च अपेक्षित
- मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाअंतर्गत (एमयूटीपी-IIIअ) गोरेगाव-बोरिवलीपासून हार्बर मार्गिकेच्या विस्तारासाठी (7 किमी) 826 कोटी रुपये खर्च अपेक्षित
- मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाअंतर्गत (एमयूटीपी-IIIअ) बोरिवली-विरार पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी (26 किमी) 2184 कोटी रुपये खर्च अपेक्षित
- मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाअंतर्गत (एमयूटीपी-III) विरार-डहाणू रोड तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेसाठी (64 किमी) 3587 कोटी रुपये खर्च अपेक्षित
- मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाअंतर्गत (एमयूटीपी-III) पनवेल-कर्जत उपनगरीय मार्गिकेसाठी (29.6 किमी) 2782 कोटी रुपये खर्च अपेक्षित
- मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाअंतर्गत (एमयूटीपी-III) ऐरोली-कळवा उन्नत उपनगरीय मार्गिकेसाठी (3.3 किमी) 476 कोटी रुपये खर्च अपेक्षि्त
- मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाअंतर्गत (एमयूटीपी-IIIअ) कल्याण-आसनगाव चौथ्या मार्गिकेसाठी (32 किमी) 1759 कोटी रुपये खर्च अपेक्षित
- मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाअंतर्गत (एमयूटीपी-IIIअ) कल्याण-बदलापूर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेसाठी (14 किमी) 1510 रुपये खर्च
- निळजे-कोपर डबल कॉर्ड मार्गिकेसाठी (5 किमी) 338 कोटी रुपये खर्च अपेक्षित
या सर्व प्रकल्पांसाठी केंद्र सरकारने 16,200 कोटींच्या निधीला मंजूरी दिली आहे. यामुळे मुंबईची लोकल सेवा अद्ययावत आणि अधिक वेगवान करणे शक्य होणार आहे. शिवाय लाखो मुंबईकर आणि उपनरांतील नागरिक रेल्वेने प्रवास करतात, त्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. ही निश्चितच समाधान देणारी बाब आहे. दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फक्त असे निर्णय घेतले जात असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे.





