महाराष्ट्रासाठी पुढील दोन – तीन दिवस अतिशय महत्त्वाचे असणार आहे. हवामान विभागाने राज्याच्या काही भागात 4 ऑक्टोबर पर्यंत विविध भागांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून संपूर्ण राज्याला पावसाने झोडपून काढले. शेती आणि पिकांची मोठी हानी झाल्याचे आपण सर्वांनी पाहिले. त्यानंतर पावसाला काही ब्रेक मिळाला. परिस्थिती पुर्वपदावर येताना दिसत आहे. आता पुन्हा राज्याच्या काही भागात तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मराठवाडा-विदर्भात पावसाचा अंदाज
हवामान विभागाने 4 ऑक्टोबरपर्यंत राज्यातील विविध भागांत मुसळधार पावसाचा इशारा दिला असून आज मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह आणि संपूर्ण विदर्भासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. महाराष्ट्रासाठी पुढील 72 तास अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. या कालावधीत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जाहीर केला आहे. या अलर्टचा अर्थ या भागातील नागरिकांनी हवामानातील बदलांबाबत सतर्क राहणे आवश्यक आहे. मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि विदर्भातील अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते हलक्या स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
कोकण-पश्चिम महाराष्ट्रात उघडीप
सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाच्या बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली आहे. मागील काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक भागांत शेतजमिनींचे आणि उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पूरसदृश परिस्थिती आणि नद्यांच्या पातळीतील वाढ यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई आणि पुणे यांसारख्या प्रमुख शहरांमध्येही आज हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या काळात पावसामुळे मोठे नुकसान होण्याची भीती नाही. कारण, पाऊस सामान्य स्वरूपाचा राहणार आहे, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. या काळात नागरिकांना सतर्कता बाळगावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.











