बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा; पूरस्थितीमुळे परीक्षा अर्ज भरण्यास २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. अतिवृष्टी, पूरपरिस्थितीमुळे परीक्षा अर्ज भरण्यास २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षणमंत्र्यांना निर्देश दिले आहेत.

महाराष्ट्रातील मराठवाड्यातील सर्व जिल्हे, विदर्भातील काही जिल्ह्यांत आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुरस्थितीमुळे जनजीवन बाधित झाले आहे. शाळा, अथाव महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देखील याचा मोठा फटका बसला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कामकाज विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत बारावीच्या बोर्ड परीक्षांचे फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

बारावी परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ

राज्यात होत असलेली अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षा अर्ज भरण्यास अडचण येत असल्याने त्याला दि. २० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य परीक्षा मंडळाने घेतला आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना दूरध्वनी करून मुदतवाढ देण्याबाबत निर्देश दिले होते.

राज्यातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींना परीक्षा अर्ज भरण्याची उद्या दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी शेवटची मुदत आहे. मात्र मराठवाडा, नाशिक, सोलापूर, अहिल्यानगर आणि राज्यात होत असलेली अतिवृष्टिमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मुदतीत परीक्षेसाठी अर्ज भरणे शक्य नसल्याने अनेक विद्यार्थ्यांनी, पालकांनी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांना संपर्क करून अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली होती.

एकनाथ शिंदेंचे शिक्षणमंत्र्यांना निर्देश

त्यानुसार उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शिक्षण मंत्री श्री. भुसे यांना बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याबाबत निर्णय घेण्यास सांगितले. शिक्षण मंत्र्यांनी लगेचच राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याशी संपर्क केला आणि अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याचे निर्देशही दिले. त्यानुसार शिक्षण विभागामार्फत २० ऑक्टोबर पर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात शिक्षण विभागामार्फत परिपत्रक जारी करण्याची प्रक्रिया करण्यात आली. त्याचबरोबर बाह्य पद्धतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील अर्ज भरण्याची मुदत १५ ऑक्टोबर पर्यंत वाढविण्यात आली आहे तसेच नवीन परीक्षा केंद्रासाठी अर्ज स्वीकारण्याची मुदत १० ऑक्टोबर पर्यंत वाढविण्यात आली आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News