ऑक्टोबर महिना उजाडला तरी सप्टेंबर महिन्याचा लाभ लाडक्या बहिणींना मिळालेला नाही. सप्टेंबर महिन्याचा लाभ अद्याप न मिळाल्याने लाडक्या बहिणी संभ्रमात आहेत. सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. खरंतर येत्या आठवडाभरात लाडक्या बहीणींच्या खात्यामध्ये 1,500 रूपये जमा केले जाण्याची शक्यता आहे. कारण, निधीची तरतूद करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळविण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचे 1,500 रूपये जमा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लवकरच 1,500 रू. खात्यामध्ये जमा होणार
सरकारनं लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम देण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी महिला व बालविकास विभागाकडे 410 कोटी रुपये वर्ग केले आहेत. त्यामुळं लाडक्या बहिणींना लवकरच सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम शासनाकडून अदा केली जाऊ शकते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 410 कोटी रुपये वर्ग करण्यासंदर्भात शासन निर्णय सामाजिक न्याय विभागाकडून जारी करण्यात आला आहे.

नेमकी किती तारखेला रक्कम मिळणार?
आता सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे. याच हप्त्याच्या वितरणासाठी सामाजिक न्याय विभागाकडून महिला व बालविकास विभागाला 410 कोटी रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या तीन ते चार दिवसांत महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल, असे सांगण्यात येत आहे.
ई-केवायसीमुळे टेन्शन वाढलं!
लाडकी बहीण योजनेचे निकष डावलत लाभ घेणाऱ्या महिलांची धाकधुक वाढवणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाखो बोगस लाभार्थ्यांनी लाभ घेतल्याचे अनेक प्रसंग समोर आले आहेत. त्यामुळे आता सरकारने योजनेच्या प्रत्येक निकषाची कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे. यासाठी सरकारने आणखी एक महत्त्वाचा नियम लागू केला आहे. लाभार्थी महिलेला आता स्वत:सोबत वडिलांची किंवा पतीची देखील ई केवायसी करावी लागणार आहे.











