उद्याचा दिवस मुसळधार पावसाचा; पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस बरसणार!

Rohit Shinde

राज्यात पावसाचा जोर काही कमी होताना दिसून येत नाहीये. शनिवारी राज्यातील काही भागांत जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील विविध भागात झालेल्या अतिवृष्टीने बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली, जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली, घरांचे मोठे नुकसान झाले आहे. असे असतानाच आता चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. राज्यातील 9 जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

शनिवारी अनेक भागात मुसळधार!

भारतीय हवामान विभागामार्फत, राज्यात नांदेड, लातूर, धाराशिव, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर या नऊ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. यासोबतच पुणे घाट, सातारा घाट आणि कोल्हापूर घाट परिसरात 27 सप्टेंबर 2025 रोजीसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे. भारतीय हवामान विभाग आणि राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग केंद्र या केंद्रीय संस्था सोबत सतत संपर्क साधून पुढील हवामानाच्या अंदाजाची माहिती घेऊन सर्व जिल्ह्यांना प्रसारित करण्यात येत आहे.

रागासा चक्रीवादळाचा धोका

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र बनला असून तो ‘रागासा’ चक्रीवादळाच्या स्वरूपात विदर्भाकडे सरकत आहे. या चक्रीवादळामुळे हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. हेच रागासा चक्रीवादळ पुढे मराठवाड्याच्या दिशेने सरकरणार आहे. त्यामुळे मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत या काळात मुसळधार पावसाची शक्यता आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, नांदेड, लातूर, धाराशिव, हिंगोली, जालना, धाराशिव, सोलापूर, अहिल्यागनर आणि संभाजीगर, पुणे या जिल्ह्यांना सर्वाधिक धोका आहे.

या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे रक्षण करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी, तसेच नागरिकांनी बाहेर पडताना आवश्यक काळजी घ्यावी. संभाव्य पूरस्थिती आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या