नवी दिल्ली: गेल्या 4 महिन्यांत सोने प्रतितोळा म्हणजेच 10 ग्रॅम पाठिमागे 28,838 रूपयांनी महागले आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 76,162 रूपयांवरून 28,838 रूपयांनी वाढून 1 लाख रूपयांच्या पुढे गेला आहे. त्याच बरोबर चांदीचा दर प्रतिकिलो 86,017 रूपयांवरून 9,883 ने वाढून 95,900 रूपये प्रतिकिलो वर पोहोचला आहे.
गोल्डमन सॅक्सचा आश्चर्यकारक अंदाज
अमेरिका चीन या दोन्ही राष्ट्रांतील वाढते व्यापारयुद्ध आणि जागतिक मंदीच्या शक्यता यामुळे सोने चांदीच्या दरांत आगामी काळात मोठे बदल पाहायला मिळतील, अशी शक्यता गोल्डमन सॅक्सने वर्तवली आहे. यंदा सोने 1 लाख 10 हजारांचा टप्पा पार करेल, अशी शक्यता गोल्डमन सॅक्सने वर्तवला आहे. 1947 रोजी जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा सोन्याची किंमत प्रती 10 ग्रॅम 88.62 रूपये प्रति किलो इतका होता. तेव्हापासून सोने 1,127 पटींनी महागले आहे.

1947 मध्ये चांदीचा दर प्रति किलो 107 रूपये इतका होता. तर आज चांदीचा दर 1 लाखांच्या घरात पोहोचला आहे, गेल्या 18 वर्षांत चांदीचा दर 10 हजारांवरून 1 लाखांवर पोहोचला आहे.
सोन्याचे दर घटणार की नाही?
जागतिक तज्ज्ञांच्या अंदाजानुसार सद्यस्थितीत अमेरिका मोठ्या संभ्रमात सापडली आहे. त्यामुळे सोन्याचे दर खाली येण्याबाबत मोठी अनिश्चितता आहे. जोपर्यंत अमेरिका चीन यांच्यातील व्यापार युद्ध शांत होत नाही, पुढील चित्र स्पष्ट होत नाही, तोपर्यंत सोने-चांदीचे दर घटण्याची शक्यता नाही. आगामी तीन महिन्यांत सोने चांदीच्या दरांचा आलेख वाढताचा राहिलं असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सोन्याच्या दरात वाढ होण्याची कारणे
रशिया-युक्रेन युद्ध, हमास इस्रायल संघर्ष, चीनचा विस्तारवाद ही जागतिक बाजारातील अस्थिरतेची प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे बँकांचे व्याजदरांचे धोरण सातत्याने बदलत राहिले. त्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयात शुल्कवाढीच्या निर्णायाने देखील जगात अस्थिरता निर्माण केली. यामुळे जागतिक बाजारातील स्थिती आता अत्यंत नाजूक बनत चालली आहे.
अस्थिरता वाढल्याने जगभरातील बँकांनीही सोने खरेदीवर जोर दिला आहे. यामुळे सोन्याच्या दरांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.चालू वर्षात सोन्याच्या दरांत आतापर्यंत 26 टक्के वाढ झाली आहे. व्यापार युद्धामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदीकडे पाहिले जात आहे. परिणामी दर वाढ होत आहे.











