देशभरात सायबर फसवणुकींचा प्रसार वेगाने वाढत आहे. ऑनलाईन बँकिंग, UPI, आणि खरेदीच्या प्लॅटफॉर्मवर संशयी लिंक, फिशिंग मेसेज आणि खोट्या अँप्सद्वारे लोकांचे पैसे लुटण्याचे प्रकार सतत वाढत आहेत. अनेक वेळा लोकांच्या खात्यातून अचानक पैसे निघून जातात किंवा खोटी ओळखपत्रे बनवून नुकसान केले जाते. मात्र आता सायबर आर्थिक फसवणुकीच्या काही हादरवून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. ज्यामध्ये ना ओटीपी, ना लिंक तरी फसवणूक केली जाते. नेमकं कसं ते जाणून घेऊ….
ना ओटीपी, ना लिंक…तरी फसवणूक
ना कोणतीही लिंक, ना ओटीपी ना कोणताही फोन काहीही न करताही एका व्यापाऱ्याच्या खात्यातून साडेचार लाख रुपये उडवले आहेत. गोव्यातील एका व्यापाऱ्याच्या बँक खात्यातून तब्बल साडेचार लाख रुपये गायब झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे, या व्यापाऱ्याने ना कोणतीही लिंक शेअर केली होती, ना ओटीपी दिला होता. तरीदेखील त्यांचं खातं रिकामं झालं. या प्रकरणी नेहरू नगर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली.गोवंडीतील शिवाजी नगर परिसरात राहणारे व्यापारी मोहम्मद अमरराज अन्वर कुरेशी १५ ऑगस्ट रोजी कामानिमित्त आपल्या मूळगावी गेले होते. त्यांचा मोबाईल त्या काळात बंदच होता.

जवळपास महिन्यानंतर, २२ सप्टेंबर रोजी ते परत आले आणि मोबाईल सुरू करताच बँकेकडून आलेले मेसेज पाहून ते थक्क झाले. त्यांच्या खात्यातून पैसे डेबिट झाल्याचे त्यांना मेसेज येत होते.एकूण 5 लाख 6 हजार 580 रुपये त्यांच्या खात्यातून काढले होते. या प्रकरणानंतर कुरेशी यांनी तत्काळ बँकेशी संपर्क साधला. बँकेच्या ऑनलाइन आर्थिक फसवणूक नियंत्रण विभागात त्यांनी तक्रार दाखल केली.
तांत्रिक चौकशीतून त्यांनी पैशांची ट्रान्सफर कशी आणि कुठून झाली, याचा मागोवा घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, पोलिसही या घटनेचा सखोल तपास करत असून ऑनलाइन फसवणुकीच्या नव्या पद्धतीकडे लक्ष वेधले जात आहे.











