नवी दिल्ली – गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर भारतावर अतिरिक्त 25 टक्के आयात कर म्हणजेच टेरिफ लावण्याचा निर्णय अमेरिकेच्या ट्रम्प सरकारनं घेतला आहे. त्याची अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी 9.31 वाजल्यापासून हा नवा टेरिफ देशावर लागू होणार आहे.
विघ्नहर्त्यानं आता देशावरील आलेलं हे विघ्न दूर करावं, अशी विनंती भक्तगणांकडून करण्यात येते आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 6 ऑगस्ट रोजी रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून भारतावर शिक्षा म्हणून जादा कर आकारण्याच्या निर्णयाची घोषणा केली होती. हा कर 25 टक्के जादा असणार आहे.
यापूर्वी व्यापारात तोटा होत असल्याचं सांगत भारतावर यापूर्वी 25 टक्के टेरिफ लागू केला होता. त्याचीही अंमलबजावणी उद्यापासूनच होणार आहे. त्यामुळे भारतातील निर्यात वस्तूंवर यापुढे अमेरिकेत 50 टक्के जादा टेरिफ मोजावा लागणार आहे.
टेरिफच्या या निर्णयाचा सामान्य माणसावर काय होणार परिणाम?
1. देशातील उद्योगांवर होणार परिणाम
ट्रम्प यांच्या निर्णयाचा फटका भारतातील अनेक उद्योगांना बसणार आहे. त्यात ज्वेलरी, टेक्स्टटाईल, ऑटो, सीफूड या उद्योगांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. या उद्योगांना नफा कमी होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते टेरिफ कमी झाला नाही तर भारतातून निर्यात होत असलेल्या ४८.२ अब्ज डॉलर्सवर याचा थेट परिणाम होणार आहे.
2. टेरिफचा परिणाम कोणत्या क्षेत्रांवर होणार नाही
अमेरिकेच्या टेरिफचा हा परिणाम आयटी, फार्मा आणि इलेक्टॉनिक्स इंडस्ट्रीवर होणार नाही. सध्या इलेक्टॉनिक्सच्या वस्तूंना निर्यातीत 232 टक्क्यांची सूट मिळते आहे. जोपर्यंत सेक्शन 232 बाबत कोणतीही घोषणा होत नाही तोपर्यंत या सेक्टरवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं सांगण्यात येतंय.
भारत अमेरिकेला किती निर्यात करतो?
भारतातून अमेरिकेला दरवर्षी साधारण 7.59 लाख कोटींची निर्यात करण्यात येत. यात मशिनरी, इलेक्टॉनिक्स वस्तू, औषधं आणि फार्मा, ज्वेलरी, रेडिमेट कपडे, केमिकल्स आणि पेट्रोलियम प्रोडक्ट्सचा समावेश आहे.
सामान्य माणसावर काय होणार परिणाम?
भारतातून अमेरिकेत सर्वाधिक ज्वेलरी, कपडे, मशिनरी आणि केमिकल यांची निर्यात होते. 50 टक्के जादा टेरिफ लागल्यामुळे या वस्तू महाग झाल्यानं त्यांच्या ऑर्डर अमेरिकेतून मिळणं बंद होण्याची शक्यता आहे.
असे घडल्यास कंपन्या त्यांचं उत्पादन कमी करु शकतात. अशा परिस्थितीत कर्मचारी कपातही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर भविष्य़ात गदा येऊ शकते. मात्र याचा परिणाम केवळ याच क्षेत्रांवर नाही तर इतरही अनेक क्षेत्रांवर होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
अर्थव्यवस्था आणि जीडीपीवरही परिणाम
50 टक्के टेरिफमुले भारतातून अमेरिकेत जाणारपी निर्यात मंदावणार आहे. यामुळे निर्यातीतून सरकारला होणारं उत्पन्नही घटण्याची शक्यता आहे. या सगळ्यामुळे भारताचा आर्थिक विकास दर 0.2 टक्के ते 0.6 टक्के कमी होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या सगळ्या स्थितीत केंद्र सरकारला त्यांच्या व्यापार धोरणात भविष्यात मोठा बदल करावा लागू शकतो.





