वॉशिंग्टन डीसी – भारताबाबत केलेल्या वक्तव्यावर 12 तासांच्या आत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घूमजाव केलंय. शुक्रवारी संध्याकाळी व्हाईट हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना घूमजाव केल्याची भूमिका घेतलीय. ट्रम्प म्हणाले की, मी नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मित्र राहीन. भारतासोबत निर्माण झालेले तणावाचे संबंध रिसेट करण्यासाठी मी नेहमीच तयार आहे.
यापूर्वी शुक्रवारी सकाळी त्यांच्या सोशल मीडियावर त्यांनी वेगळी प्रतिक्रिया दिली होती, त्यात ते म्हणाले होते की, मला असं वाटतंय की अमेरिकेनं भारत आणि रशियाला चीनच्या हातात हरवू दिलं आहे. आशा आहे की त्यांचं भविष्य उज्ज्वल असेल.

पंतप्रधान मोदींची काय प्रतिक्रिया
शनिवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य शेअर करत पंतप्रधान मोदींनी यावर प्रतिक्रिया दिलीय. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या भावनांचा आणि दोन्ही नेत्यांच्या संबंधांबाबत त्यांनी व्यक्त केलेल्या विचारांचा ह्रदयपूर्वक स्वागत करतो, आणि त्यांच्या वक्तव्याचं समर्थनही करतो. भारत आणि अमेरिकेत सकारात्मक आणि दूरदृष्टी असलेली रणनीतिक भागिदारी आहे.
ट्रम्प पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले?
व्हाईट हाऊसमधील पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदी हे एक चांगले पंतप्रधान असल्याचं सांगितलंय. मात्र सध्या त्यांची काही कृत्ये आवडत नसल्याचं ट्रम्प म्हणालेत. भारत आणि अमेरिकेचं नातं महत्त्वपूर्ण आहे. चिंता करण्याची कोणतीही बाब नाही. आम्ही चांगले मित्र आहोत, असंही ट्रम्प पुढं म्हणाले.
भारत आणि इतर देशांसोबत सुरु असलेली व्यापार चर्चा चांगली सुरु असल्याचं ट्रम्प म्हणालेत. मात्र युरोपीय संघानं गुगलवर लावलेल्या 3.5 अब्ज डॉलर्सच्या दंडाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्यानं नाराज असल्याचं ट्रम्प म्हणालेत. याच कारणासाठी भारतावर 50 टक्क्यांपेक्षा जास्त टेरिफ लावल्याचंही ट्रम्प यांनी सांगितलंय.
पंतप्रधान मोदी अमेरिकेशी असलेल्या संबंधांना विशेष महत्त्व देतात- परराष्ट्रमंत्री
पंतप्रधानांनी ट्रम्प यांच्याबाबत दिलेल्या प्रतिक्रियेनंतर परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनीही यावर विधान केलंय. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी अमेरिकेशी असलेल्या भागिदारीला विशेष महत्त्व देतात. ट्रम्प यांच्याबाबत म्हणाल तर त्यांचे आणि पंतप्रधान मोदींचे पूर्वीपासून जिव्हाळ्याचे संबंध आहेत. सध्या तरी अमेरिकेशी आपण जोडलेलो आहोत, असंही सांगत अधिक भाष्य करण्यास त्यांनी नकार दिलाय.
माजी अमेरिकेचे एनएसए म्हणाले होते की ट्रम्प मोदी यांची मैत्री संपली
भारत आणि अमेरिकेत सुरु असलेल्या टेरिफ तणावानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बेल्टन यांनी ट्रम्प आणि मोदी यांची मैत्री आता संपली असल्याचं विधान 4 सप्टेंबरला केलं होतं. ट्रम्प यांच्या धोरणावर टीका करत, व्हाईट हाऊसनं अमेरिका-भारत संबंधांना काही दशकं मागे नेल्याची टीकाही त्यांनी केली होती. त्यामुळेच मोदी, रशिया आणि चीनच्या जवळ गेल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. चीन आता अमेरिका आणि ट्रम्पचा पर्याय म्हणून जागतिक पातळीवर पुढे येत असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.











