Hong Kong Fire : हाँगकाँगच्या ताई पो परिसरातील वांग फुक कोर्टच्या अनेक टॉवर्सना आग लागली आहे, ज्यामध्ये 44 जणांचा मृत्यू झाला आहे आणि 279 जण बेपत्ता आहेत. 32 मजली इमारतीवरील जळत्या स्कॅफोल्डिंगमुळे (मचान) कोसळल्याने आग वेगाने पसरली. इमारती उंचच उंच असल्याने बचावकार्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. वांग फुक कोर्ट हे 8 टॉवर ब्लॉक्सचे मोठे निवासी संकुल असून, तेथे 4 हजारहून अधिक नागरिक राहतात. यामध्ये मोठी लोकसंख्या 65 वर्षांवरील वयोवृद्धांची आहे.
कशी लागली आग ? Hong Kong Fire
हाँगकाँगमधील तैपो येथील बुधवारी (26 नोव्हेंबर 2025) 7 बहुमजली इमारतींमध्ये आग लागली. ज्यावेळी आगीची घटना घडली, त्यावेळी लोक मोठ्या संख्येने घरात होते. लोकांना घरातून बाहेर पडण्याची साधी संधी देखील मिळाली नाही, आग तर दुसरीकडे अगदी वाऱ्यासारखी पसरत गेली. संपूर्ण इमारत बांबू स्कॅफोल्डिंगने झाकलेली असल्याने आग लवकर इतर मजल्यांवर आणि शेजारच्या टॉवर्सपर्यंत पोहोचली. काही मिनिटांतच बांबूचे जळते ढांचे खाली कोसळू लागले आणि आग दुसऱ्या टॉवर्समध्ये पसरत गेली. 8 पैकी तब्बल 7 टॉवर्स आगीच्या विळख्यात सापडले. या आगीत आतापर्यंत 44 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 300 जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. हि आग कशी लागली याचा तपास आता केला जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी ३ संशयितांना ताब्यात घेतलं आहे.Hong Kong Fire

अग्निशामक दल घटनास्थळी
सध्या अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु आहे. आग विझविण्यासाठी आणि लोकांना बाहेर काढण्यासाठी 700 हून अधिक अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी सतत काम करत आहेत. परंतु धूर, उंची आणि अरुंद पायऱ्या यामुळे बचाव कार्य करताना मोठा अडथळा निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी, उंच मजल्यांवरून पाणी फवारण्यासाठी हायड्रॉलिक शिड्यांचा वापर केला जात आहे. विशेष म्हणजे आग काल दुपारी लागली असली तरीही रात्री उशीरापर्यंत ही आग विझली नव्हती. इमारतींची उंची जास्त असल्याने आग विझवण्याचे मोठे आव्हान आहे.











