आज सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक घटना घडली आहे. सुनावणी दरम्यान धक्कादायक घटना घडली. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. सुप्रीम कोर्टात वकिलाकडून सुनावणी दरम्यान बूट फेकण्याचा प्रयत्न झाला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वकिलाला वेळीच रोखलं. सरन्यायाधीश भूषण गवईंनी एका सुनावणीदरम्यान सनातन धर्माचा अपमान केला, असा आरोप या वकीलांकडून करण्यात येत आहे.
सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका खटल्याची सुनावणी सुरू असताना ही घटना घडली. कोर्टरूममध्ये उपस्थित असलेल्या वकिलांचा हवाला देत, वृत्तसंस्था पीटीआयने वकिलाने सरन्यायाधीशांच्या दिशेनं बूट फेकल्याचे वृत्त दिलं आहे.

तथापि, बूट त्यांच्या खंडपीठापर्यंत पोहोचला नाही. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताबडतोब तो जप्त केला. निघताना वकिलाने ओरडून सांगितले की, “हिंदुस्थान सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही.” या घटनेनंतर, सरन्यायाधीशांनी न्यायालयात उपस्थित असलेल्या वकिलांना त्यांचे युक्तिवाद सुरू ठेवण्यास सांगितले. ते म्हणाले, “या सर्व गोष्टींनी काळजी करू नका. मलाही काळजी नाही; या गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही.”
वकिलाच्या मनात नेमका कशाचा राग?
मध्य प्रदेशातील खजुराहो येथे भगवान विष्णूच्या 7 फूट उंच शिरच्छेदित पुतळ्याच्या जीर्णोद्धारावर सरन्यायाधीश गवई यांच्या टिप्पण्यांमुळे वकील नाराज असल्याचे मानले जाते. 16 सप्टेंबर रोजी, सरन्यायाधीशांनी तुटलेल्या मूर्तीच्या जीर्णोद्धाराची मागणी करणारी याचिका फेटाळून लावत म्हटले की, “जा आणि देवाला स्वतःहून ते करायला सांगा. तुम्ही भगवान विष्णूचे कट्टर भक्त असल्याचा दावा करता, म्हणून जा आणि त्यांची प्रार्थना करा.” त्यानंतर हा संताप निर्माण झाल्याचे सांगण्यात येते.
भगवान विष्णूच्या मूर्तीच्या बदलीबाबतच्या त्यांच्या टिप्पण्यांवर सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी स्पष्टीकरण दिले. त्यांनी म्हटले की त्यांच्या टिप्पण्या सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने सादर केल्या गेल्या. त्यांनी म्हटले की ते सर्व धर्मांचा आदर करतात. न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन, जे खंडपीठाचा भाग होते, त्यांनी सोशल मीडियाला अँटी-सोशल मीडिया म्हटले.











