नवी दिल्ली – मुंबईच्या पंजाब नॅशनल बँकेत 13 हजार 580 कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी आणि परदेशात परागंदा झालेला व्यापारी मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारनं बेल्जियम सरकारला एक पत्र पाठवून चोक्सीची मुंबईतल्या तुरुंगात योग्य तजवीज करण्यात येईल असं सांगितलंय. प्रत्यार्पणानंतर चोक्सीला मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात बराक नंबर 12 मध्ये ठेवण्यात येणार आहे. या कोठडीत एकाचवेळी 6 जणं राहू शकतात.
चोक्सीला बेल्जियमनं भारताच्या ताब्यात दिलं, तर मेहुल चोक्सीसोबच माणुसकीच्या आधारानं व्यवहार करण्यात येईल, असंही केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय. मेहुल चोक्सीला भारतात आल्यानंतर तुरुंगात 14 पेक्षा जास्त सेवा देण्यात येणार असल्याचंही केंद्राकडून स्पष्ट करण्यात आलंय. मात्र केंद्रानं हे पत्र नेमकं कधी दिलं आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

कोण आहे मेहुल चोक्सी?
भारतीय तपास यंत्रणांच्या आवाहानानंतर मेहुल चोक्सीला 12 एप्रिलला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली आहे. मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदी हे पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याचे प्रमुख आरोपी आहेत. या दोघांनीही 2018 साली भारतातून पलायन केलेलं आहे. नीरव मोदी सध्या लंडनमध्ये वास्तव्यास आहे.
आर्थर रोड तुरुंगात चोक्सीसाठी कोणत्या सुविधा?
आर्थर रोडमध्ये असलेल्या गर्दीत मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणानंतर त्यावा 12 नंबरची बराक देण्यात येणार आहे. ही कोठडी 20 बाय 15 फुटांची आहे. या बराकला लागून बाथरुम आणि स्वच्छतागृह आहे. मेहुल चोक्सीला तीन वेळा जेवण आणि स्वच्छ पाणी पुरवण्यात येणार असल्याचंही कळवण्यात आलंय. चोक्सीच्या झोपण्याच्या व्यवस्थेसाठी गादी, उशी, चादर आणि पांघरुणही देण्यात येणार आहे. कोर्टानं परवानगी दिली तर झोपण्यासाठी लोखंडी किंवा लाकडी बेड देण्याचीही तयारी केंद्रानं दर्शवली आहे. या बराकमध्ये सिलिंग फॅन आणि लाईटही असतील. या कोठडीवर 24 तास सीसीटीव्हीच्या द्वारे पाळत ठेवण्यात येणार आहे. यासोबतच योग, मेडिटेशन आणि लायब्ररीची सुविधाही चोक्सीसाठी उपलब्ध असेल. कोर्टाच्या ऑर्डरनुसार घरचं जेवण आणि आरोग्य तपासणीसाठी जेजे हॉस्पिटल देण्याचा पर्यायही देण्यात आला आहे.
मुंबईत कमी उष्णता असल्यानं एसी नाकारला
गृहमंत्रालायानं हे स्पष्ट केलं आहे की, हे पत्र पाठवेपर्यंत आर्थ रोडच्या 12 नंबर बराकमध्ये कोणताही कैदी नव्हता. मुंबईतील हवामान सुखावह असल्यानं बराकमध्ये एसी लावण्याची गरज नाही, असंही केंद्राच्या वतीनं सांगण्यात आल्याची माहिती आहे. देशातल्या कुठल्याच तुरुंगात एसी लावला जात नाही, असंही कळवण्यात आलेलं आहे.
आरोग्य सुविधेसाठी काय ?
गरज भासल्यास मेहुल चोक्सीला 24 तास आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील हेही सांगण्यात आलंय. यात सहा मेडिकल ऑफिसर, नर्स, फार्मासिस्ट आणि लॅबचा सपोर्ट असणार आहे. आसीयू सेवेसह 20 बेडचं हॉस्पिटल जेलमध्येच असल्याचंही सांगण्यात आलंय. अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली तर 3 किमी अंतरावर असलेल्या जेजे रुग्णालयात दाखल करण्याचा पर्यायही ठेवण्यात आलेला आहे. आरोपी चोक्सीला त्याच्या वैयक्तिक खर्चातून ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल असंही स्पष्ट करण्यात आलंय.
स्वित्झर्लंडहून पळण्याच्या तयारीत होता मेहुल
मेहुल चोक्सी हा बेल्जियममध्ये असल्याचं मार्चमध्ये समोर आलं. मेहुलची पत्नी प्रीती हिच्यासोबत तो राहत असून, प्रीती यांच्याकडे बेल्जियमची नागरिकता आहे. बेल्जियमच्या परराष्ट्र मंत्रालयानं मेहुल तिथं असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाला कळवलं होतं. यानंतर मेहुल चोक्सी स्वित्झर्लंडमध्ये पळण्याच्या तयारीत असताना त्याला अटक करण्यात आली.











