काठमांडू- नेपाळ हिंसाचाराने होरपळला. त्यापूर्वी हिंसाचाराचं हे चित्र शेजारच्या बांगलादेशात दिसलं होतं. त्याच्या अगदी दोन वर्ष आधी असंच भयंकर चित्र श्रीलंकेत दिसलं. त्यामुळे आता प्रश्न पडतोय, की भारताचा शेजार असंतोषाने बेजार का झाला?
श्रीलंका (मे 2022)
श्रीलंकेत दोन ते तीन वर्षांपूर्वी नेपाळसारखाच उद्रेक पाहायला मिळाला होता. आर्थिक संकट आणि अन्न- व इंधनाच्या टंचाईमुळे जनआंदोलन उभं राहिलं. राष्ट्रपती भवनावर हल्ला करण्यात आला, राष्ट्रपती राजपक्षे यांना राजीनामा द्यावा लागला. श्रीलंकेतील हिंसाचारानंतर राजपक्षे कुटुंबासह मालदिवमध्ये पळून गेले
बांगलादेश (ऑगस्ट 2024)
गेल्या वर्षी या असंतोषाची धग बांग्लादेशमध्येही दिसली. सरकारच्या आरक्षण धोरणाविरोधात विद्यार्थ्यांचा तीव्र रोष उसळला. आंदोलकांनी तत्कालिन पंतप्रधान शेख हसिना यांच्या निवासस्थानावर हल्ला केला. पंतप्रधान शेख हसिना यांना देश सोडून पळून जावं लागलं. 16 वर्षांच्या सत्तेचा अस्त झाला, मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार आलं.
नेपाळ (सप्टेंबर 2025)भ्रष्टाचार आणि घराणेशाहीविरोधात जेन झेड तरुण रस्त्यावर उतरले. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या घरांवर हल्ला करण्यात आला, हिंसाचाराने देश होरपळला. पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी राजीनामा दिला
का धुमसतंय नेपाळ?
गेल्या काही वर्षांत, भारताच्या शेजारील देशांमध्ये झालेली ही जनआंदोलनं एक समान धागा दर्शवतात. जेन झेड पिढी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रमाणात संघटित होतेय. आणि तेच चित्र आता नेपाळमध्येही दिसतंय. या आंदोलनांमध्ये राजकीय पक्षांचा थेट सहभाग नसला तरी, त्यांचा रोख हा सरकार आणि त्यांच्या धोरणांवर आहे.
नेपाळमधल्या जेन झी तरुणाईनं सुरू केलेलं हे आंदोलन इतकं आक्रमक झालंय की नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांचं घर पेटवून देण्यात आलं. पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या घरावरही हल्ला झाल्यानं पंतप्रधानांच्या पायाखालची वाळू सरकलीय. राजधानी काठमांडूमध्ये जाळपोळ करण्यात आली. नेपाळी काँग्रेस पक्षाचं कार्यालय पेटवण्यात आलं. मंत्र्यांची घरं, कार्यालयं जाळण्यात आली. राष्ट्रपतींच्या घराला आग लावल्याची माहितीही समोर आली आहे. पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी देश सो़डून दुबईला पलायन केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या असंतोषाच्या लाटेने आशिया खंडातल्या अनेक देशांची समीकरणं बदललीयेत. शांततापूर्ण सुरू झालेली ही आंदोलनं हिंसक वळण घेतायत. ज्याचा थेट परिणाम या देशांच्या राजकीय आणि सामाजिक स्थिरतेवर होतोय. त्यामुळे शेजारील राष्ट्र म्हणून या घटना भारतासाठीही एक महत्त्वाचा धडा देत आहेत.











