नेपाळचा संघर्ष नव्या वळणावर, हंगामी पंतप्रधान कोण होणार, यावरुन जेन झेड आंदोलकांमध्येच चकमक

नेपाळमध्ये महाराष्ट्रासह देशभरातील सुमारे 1000 पेक्षा जास्त पर्यटक अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. भारत-नेपाळ सीमा आणि विमानतळं बंद असल्यानं परतीचे उपाय करण्याची मागणी नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांकडून करण्यात येतेय.

काठमांडू – नेपाळमध्ये जेन झेड आंदोलकांच्या उद्रेकानंतर क्रांतीसारखी परिस्थिती निर्माण झआली आहे. नेपाळचे पंतप्रधान केपी ओली शर्मा यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. अशा स्थितीत हंगामी पंतप्रधान कोण होणार यावर सहमती होताना दिसत नाहीये. गुरुवारी पंतप्रधानांच्या नाववरुन जेन झेडच्या आंदोलकांत दोन गट पडले. त्यानंतर सेना मुख्यालयासमोर या दोन्ही गटांत चकमक झाली. या चकमकीत अनेक तरुण जखमी झाले आहेत.

पंतप्रधानाच्या नाववर गेल्या दोन दिवसांपासून सेना मुख्यालयात आंदोलनकर्त्यांशी चर्चा सुरु आहे. जेन झेड आंदोलकांच्या एका गटानं ही चर्चा सेना मुख्यालयात करण्याएवजी राष्ट्रपती भवनात व्हायला हवी, अशी मागणी केली आहे.

सुशीला कार्की यांच्या नावाला एका गटाचा विरोध

आंदोलनकर्त्यांच्या एका गटानं हंगामी पंतप्रधानपदासाठी सुशीला कार्की यांच्या नावाला विरोध केला आहे. सुशीला कार्की या भारताच्या समर्थक असल्याचं कारण त्यासाठी देण्यात आलंय. काठमांडूचे महापौर बालेन शाह यांना पंतप्रधान करण्याची मागणी करण्यात आली आहे. जर बालेन पंतप्रधान झाले नाहीत तर धरानचे महापौर हरका सम्पांग हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील.

आंदोलनकर्ते अखेर आले समोर

नेपाळमध्ये सत्तापालट झाल्यानंतर दोन दिवसांनी जेन झेड आंदोलनाचे नेते समोर आले आहेत. अनिल बनिया आणि दिवाकर दंगल यांनी सांगितलं की, तरुणांनी हे विरोधी आंदोलन जुन्या नेत्यांना वैतागून केलेलं आहे. युवक आंदोलकांची इच्छा संसद भंग करण्याची आहे, घटना भंग करण्याची नाही.

हिंसाचार थांबला, काठमांडूत प्रत्येक नागरिकाची तपासणी

नेपाळमध्ये झालेल्या उद्रेकानंतर आत्तापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला आहे. सरकार अस्तित्वाच नसल्यानं आता नेपाळवर सैन्यदलाचा ताबा आहे. काठमांडू शहरात हिंसा थआंबली असली तरी सावधगिरीचा उपाय म्हणून प्रत्येक नागरिकाची तापसणी करण्यात येते आहे. अशा स्थितीत जेन झेड आंदोलकांचं पंतप्रधान पदावर एकमत होताना दिसत नाहीये.

मोठ्या संख्येनं भारतीय अडकले

नेपाळमध्ये सुरु झालेल्या हिंसाचारामुळं नेपाळमध्ये गेलेले अनेक भारतीय अडकून पडलेले आहेत. आता केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच्या वतीनं या अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. नेपाळमध्ये महाराष्ट्रासह देशभरातील सुमारे 1000 पेक्षा जास्त पर्यटक अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. भारत-नेपाळ सीमा आणि विमानतळं बंद असल्यानं परतीचे उपाय करण्याची मागणी नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांकडून करण्यात येतेय.


About Author

Smita Gangurde

Other Latest News